

US-Russia Submarines
मॉस्को: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन अमेरिकी अण्वस्त्र-सज्ज सबमरीनना “योग्य ठिकाणी” हालवण्याचे आदेश दिल्याच्या घोषणेनंतर रशियामधून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
रशियाच्या संसदेतील (ड्यूमा) एका वरिष्ठ खासदाराने सांगितले की, "जगभरातील महासागरांमध्ये रशियन अण्वस्त्र-सज्ज पाणबुड्यांची उपस्थिती अमेरिकेपेक्षा अधिक आहे आणि ट्रम्प यांनी हलवलेल्या पाणबुड्या पूर्वीपासूनच आमच्या लक्षात आहेत."
रशियन खासदार व्हिक्टर वोडोलात्स्की यांनी सरकारी वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, "ही हालचाल रशियासाठी कोणत्याही नव्या उत्तराची गरज निर्माण करत नाही."
ट्रम्प यांनी Truth Social या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले की, रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले दिमित्री मेदवेदेव यांनी दिलेल्या “अत्यंत भडकाऊ विधानां”मुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
वोडोलात्स्की यांनी अधिक स्पष्ट करत सांगितले की, "ते दोन अमेरिकन सबमरीन जावोत, त्यांनी खूप आधीच आमच्या निशाण्यावर येऊन बसल्या आहेत." तसेच त्यांनी असेही सुचवले की अमेरिका व रशियेमध्ये एक मूलभूत करार होणे आवश्यक आहे, ज्यामुळे "जग तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांपासून दूर राहील."
दरम्यान, रशियामधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विषयांच्या मासिकाचे संपादक फ्योदोर ल्युक्यानोव्ह यांनी ट्रम्प यांच्या विधानांबाबत संयमित भूमिका घेतली. RBC टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, "ट्रम्प भावनिक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात. अमेरिकी नौदलाने हे विधान पाहून आश्चर्य व्यक्त केले असेल. अद्याप ही परिस्थिती प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यावर पोहोचलेली नाही."
ट्रम्प यांच्या या विधानानंतर मॉस्को एक्सचेंज निर्देशांकातही घसरण झाली. शुक्रवारी रात्री 8.01 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10.31) निर्देशांक 2709.26 (0.99 टक्के) घसरला.
याच पार्श्वभूमीवर, अमेरिका व रशिया यांच्यातील थेट संघर्ष टाळण्याबाबत विचारताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव्ह यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, "अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाने जसे सांगितले की थेट लष्करी संघर्ष टाळणे आवश्यक आहे, त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत." लावरोव्ह म्हणाले की, "ही परस्परसमजूत अमेरिकन-रशियन संवादातून साधली गेली आहे."
अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीतही असेच मत व्यक्त केले होते की, रशिया व अमेरिका यांच्यात थेट संघर्ष होऊ नये.
अमेरिका व रशियातील सध्याचे राजनैतिक तणाव वाढत असतानाच, दोन्ही बाजूंचे काही नेते व मुत्सद्दी शांतता राखण्याचे संकेत देत आहेत. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांची सध्याची पावले आणि रशियाची सडेतोड प्रतिक्रिया जागतिक स्थैर्याच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरते. आगामी काळात हे संबंध कोणत्या दिशेने जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.