पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन अंतराळ संस्था (NASA)मध्ये कार्यरत असणार्या भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र (Neela Rajendra) यांना नोकरी गमावली लागली आहे. नासामध्ये विविधता, समता आणि समावेश (DEI) विभागाच्या प्रमुखपदी त्या कार्यरत होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, देशभरातील सर्व 'विविधता' कार्यक्रम बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या नियुक्त्या तात्काळ बंद करण्याचे आदेशही ट्रम्प सरकारने आहेत.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा)ने मार्चमध्ये विविधता, समता आणि समावेश (DEI) विभाग बंद केला; परंतु यावेळी नीला राजेंद्र यांच्यासाठी एक वेगळा नवीन विभाग तयार करण्यात आला. नीला राजेंद्र यांचे पद बदलून 'टीम एक्सलन्स अँड एम्प्लॉयी सक्सेस ऑफिसचे प्रमुख पद देण्यात आले होते. मात्र त्यांच्या कामाचे स्वरुप पूर्वी सारखेच होते.
'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) च्या संचालक लॉरी लेशिन यांनी एक ईमेल पाठवला आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, "नीला राजेंद्र आता जेपीएलचा भाग नाहीत. त्यांनी आजवर आपल्या कार्याने नासासाठी मोठे योगदान दिले होते. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो." दरम्यान, आर्थिक कारणांमुळे नासाने गेल्या वर्षी विविधता, समता आणि समावेश (DEI) विभागातील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
नीला राजेंद्र यांनी अनेक वर्षे नासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 'स्पेस वर्कफोर्स २०३०' सारख्या मोहिमांना प्रोत्साहन दिले. नासामध्ये महिला आणि अल्पसंख्याकांचा सहभाग वाढवणे हा त्यांचा उद्देश होता.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशात असे म्हटले आहे की, " विविधता, समता आणि समावेश (DEI) विभागातील कार्यक्रमांनी अमेरिकेला वंश, रंग आणि लिंगाच्या आधारे विभागले आहे. हा देशातील करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केला आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे देशात भेदभावाला प्रोत्साहन दिले जात आहे."