

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॅरिफवरून सुरु असलेल्या व्यापार संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नरमाईची भूमिका घेतली आहे. विशेषतः त्यांनी युरोपियन युनियनबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ट्रम्प यांची भेट झाली. या उभय नेत्यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबत व्यापार करार १०० टक्के शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.
ट्रम्प यांची ही नरमाईची भूमिका आयात शुल्क म्हणजेच टॅरिफवरून सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढे आली आहे. त्यांनी सुरुवातीला युरोपियन युनियनच्या आयातीवर २० टक्के कर लादला होता. त्यानंतर त्याला ९० दिवसांसाठी स्थगिती दिली.
ट्रम्प यांची टॅरिफवरुन आक्रमक भूमिका राहिली. यामुळे जगभरात व्यापार युद्ध तीव्र झाले. आता त्यांनी तडजोडीची तयारी दर्शवली आहे. ''१०० टक्के व्यापार करार होईल, पण तो एक योग्य असा करार असेल." असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. लवकरच इतर देशांसोबतही अनेक व्यापारी करार केले जाऊ शकतात, असेही त्यांनी सूचित केले. ते पुढे म्हणाले, "प्रत्येकाला करार करायचा आहे. आणि जर त्यांना करार करायचा नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी तो करू."
ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी मेलोनी यांचे मनापासून स्वागत केले. यावेळी त्यांनी त्यांचे कौतुकही केले. "मला ती खूप आवडते," असे ट्रम्प म्हणाले. "जगातील खऱ्या नेत्यांपैकी त्या एक आहेत" अशा शब्दांत ट्रम्प यांनी मेलोनी यांचे तोंडभरून कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, आमचे द्विपक्षीय चांगले संबंध आहेत. इटली पंतप्रधानांचीही हीच भावना आहे. दोन्ही बाजूंनी सहमती होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी त्यांच्या व्यापक दृष्टिकोनावर भर दिला. "पश्चिमेला पुन्हा महान बनवणे हे माझे ध्येय आहे आणि मला वाटते की आपण ते एकत्र करू शकतो." असेही ते म्हणाले.
मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा जाहीर निषेध केला होता. ट्रम्प यांचा निर्णय पूर्णपणे असल्याचे त्यांनी म्हटले होते. तरीही मेलोनी यांचा अमेरिकेशी द्विपक्षीय संबंध जपण्याचा प्रयत्न आहे. "जर मी त्यांना एक विश्वासार्ह भागीदार मानले नसते, तर मी येथे आले नसते," असे त्यांनी म्हटले आहे.