

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेलीजमध्ये एका अमेरिकी नागरिकाने चाकूचा धाक दाखवत ट्रॉपिक एअरच्या एका लहान विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तीन जण जखमी झाले. त्यानंतर एका सहप्रवाशाने त्याला गोळ्या घालून ठार मारले, असे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
बेलीज हे मध्य अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक राष्ट्र आहे. येथे ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८:३० वाजता सॅन पेद्रोला जाणाऱ्या विमानात हल्लेखोर टेलरने प्रवाशांवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर फिलिप एसडब्ल्यू गोल्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली.
संशयिताने प्रवाशांवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केल्यानंतर विमानात गोंधळ उडाला. बेलीजचे पोलिस आयुक्त चेस्टर विल्यम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची ओळख पटली असून अकिनेला सावा टेलर असे त्याचे नाव आहे. ते अमेरिकेचा नागरिक आहे. दरम्यान, ज्या प्रवाशाने हल्लेखोराला ठार केले त्याला पोलीस आयुक्त विल्यम्स यांनी "हिरो" म्हटले आहे.
हल्लेखोर व्यक्तीने विमानात चाकू कसा आणला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेच्या तपासात मदतीसाठी बेलीजच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलीजच्या ट्रॉपिक एअरच्या सेसना ग्रँड कॅरवन विमानाने १४ प्रवाशांसह कोरोजाल शहरातून उड्डाण घेतले होते. सदर विमान बेलीजमधून सॅन पेद्रो बेटाच्या दिशेने जात होते. पण हल्लेखोराने पायलटला विमान देशाबाहेर नेण्यासाठी धमकावले. विमान काही काळ बेलीज सिटीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घिरट्या घालत राहिले आणि अखेर ते इंधन संपल्याने ते धावपट्टीवर उतरले. विमान लँडिंग होताना, हल्लेखोराने इतर दोन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, या घटनेदरम्यान एका प्रवाशाकडे परवानाधारक बंदूक होती. त्याने हल्लेखोरावर गोळी झाडली. त्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला.