US-Israel Iran War | विजय आमचाच युद्धविरामानंतर दोन्ही देशांचे दावे

‘होर्मुझ’मध्ये अमेरिकेचे ट्रॅफिक व्यवस्थापन?
US-Israel Iran War |
US-Israel Iran War | विजय आमचाच युद्धविरामानंतर दोन्ही देशांचे दावे
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेने इराणवर ‘पूर्ण आणि पूर्ण विजय’ मिळवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दोन आठवड्यांच्या युद्धविराम करारानंतर ‘एएफपी’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ट्रम्प यांनी चीनने इराणला वाटाघाटींना तयार केल्याचे सांगितले आणि तेहरानच्या संवर्धित युरेनियमचा प्रश्न ‘पूर्णपणे हाताळला जाईल’असे आश्वासन दिले. इराण आणि अमेरिका-इस्राईल यांच्यातील एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा दोन आठवड्यांचा युद्धविराम करार झाला. ट्रम्प यांच्या मूळ धमकीची मुदत संपण्याच्या एक तास आधी हा करार झाला. दोन्ही बाजूंनी याला आपापल्या बाजूने विजय म्हणून सादर केले आहे. त्याचवेळी इराणनेही युद्धात आमचाच विजय झाला त्यामुळेच युद्धविरामासाठी अमेरिका-इस्रायल तयार झाले, असा दावा केला.

होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त राज्य अमेरिका मदत करेल, अशी घोषणा युद्धविराम झाल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी केली. दोन्ही देशांनी ट्रम्प यांच्या ‘इराणला उद्ध्वस्त करण्याच्या’ डेडलाईनपूर्वी एक तास आधी दोन आठवड्यांचा युद्धविराम स्वीकारला. इराणने ‘होर्मुझ’मधून सुरक्षित मार्ग देण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीमधील ट्रॅफिक बिल्डअपमध्ये मदत करेल. खूप सकारात्मक कारवाई होईल! मोठा पैसा कमावला जाईल. इराण आता पुनर्निर्माण प्रक्रिया सुरू करू शकते. आम्ही सर्व प्रकारच्या पुरवठ्यांसह सज्ज होऊन तिथे राहू आणि सर्व काही व्यवस्थित चालते आहे, याची खात्री करू. मला पूर्ण विश्वास आहे की, सर्व काही चांगले होईल.’

इराणच्या संवर्धित युरेनियमचा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल. मी तोडगा काढला नसता, तर तो हाताळला गेला नसता, असे या मुलाखतीत ट्रम्प यांनी असे स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा तेल वाहतुकीसाठी उघडण्याबाबत अजून अनिश्चितता असली, तरी दीर्घकालीन करारासाठी मजबूत चौकट तयार झाल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. चीनने इराणला वाटाघाटींना राजी केल्याचा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

अमेरिकेच्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध हवाई हल्ले दोन आठवडे स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर इस्रायलने त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी स्पष्ट केले.

इस्रायलने म्हटले की, ते अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करतात. मात्र, त्यासाठी इराणने तत्काळ होर्मुझ सामुद्रधुनी उघडावी आणि अमेरिका, इस्रायल व परिसरातील देशांवर होणारे हल्ले थांबवावेत, ही अट ठेवली आहे.

इस्रायलने सांगितले की, अमेरिकेने त्यांना आश्वासन दिले आहे की, आगामी वाटाघाटींमध्ये दोन्ही देशांच्या सामायिक हितांचे रक्षण केले जाईल.

अमेरिकेचा विजय : व्हाईट हाऊस

वॉशिंग्टन : इराण युद्धातील दोन आठवड्यांच्या संघर्षविरामाचा स्वागत करताना ‘अमेरिकेचा विजय’ असे मंगळवारी व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कारोलीन लीविट यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या शक्तिशाली लष्कराने हे यश मिळवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लीविट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, ‘हा अमेरिकेचा विजय आहे, जो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि आमच्या अद्भूत लष्कराने घडवला.’ लष्करी यशामुळे अमेरिकेला कमाल दबाव निर्माण करता आला. यामुळे ट्रम्प आणि त्यांच्या टीमला कठोर वाटाघाटी करता आल्या आणि आता दीर्घकालीन शांततेची संधी निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news