

US Iran peace deal
व्हर्साय (फ्रान्स): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक शांतता कराराच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. फ्रान्समधील व्हर्साय येथे सुरू असलेल्या जी-७ परिषदेदरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या एका विशेष डिनर दरम्यान ट्रम्प यांनी या करारावर स्वाक्षरी केली. "हा प्रवास सोपा नव्हता," अशी प्रतिक्रिया यावेळी ट्रम्प यांनी दिली.
ज्या व्हर्साय पॅलेसमध्ये हा करार झाला, त्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इतिहासात अनेक मोठे वाद आणि युद्धे संपवण्यासाठी याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध करार म्हणजे १९१९ चा 'व्हर्सायचा तह', ज्याने पहिल्या महायुद्धाचा अधिकृत शेवट केला होता. (मात्र, त्या तहामध्ये जर्मनीवर लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळेच पुढे दुसरे महायुद्ध भडकले, असे इतिहासकार मानतात.) आता याच भूमीवर अमेरिका-इराण शांतता करार झाल्याने जागतिक राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
या कराराला अधिकृतपणे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण यांच्यातील इस्लामाबाद सामंजस्य करार’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबवून तातडीने युद्धबंदी लागू करणे. इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करणे आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवणे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत भविष्यातील चर्चेची रूपरेषा निश्चित करणे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' वाहतुकीसाठी पुन्हा खुली केली जाईल, असे या करारातील मुख्य मुद्दे आहेत.
स्वाक्षरीच्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी हा करार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ट्रम्प यांनी "हे काम अजिबात सोपे नव्हते," असे सांगत पडद्यामागील कठीण वाटाघाटींचे संकेत दिले. स्वाक्षरी झाल्यानंतर ट्रम्प यांनी कराराची प्रत सर्वांना दाखवली.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत या कराराचे स्वागत केले. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हर्सायमध्ये अमेरिका आणि इराणमधील करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा करेल आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करेल. आमच्या नागरिकांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे लवकरच इंधनाच्या किमती कमी होण्यास मदत होईल," असा विश्वास मॅक्रॉन यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक स्वाक्षरीनंतरही काही तांत्रिक प्रश्न अजूनही कायम आहेत. या स्वाक्षरीमुळे अंतिम करारासाठी आवश्यक असणारा ६० दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू झाला आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. तसेच, गेल्या रविवारी ट्रम्प यांनी याच कराराला डिजिटल मंजुरी दिली होती, मग आता व्हर्सायमधील प्रत्यक्ष स्वाक्षरीचे स्वरूप त्यापेक्षा कसे वेगळे आहे, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.