Donald Trump : भारतावर हल्ला केल्यास आम्ही संरक्षण करू : डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा विश्वास
Donald Trump : भारतावर हल्ला केल्यास आम्ही संरक्षण करू : डोनाल्ड ट्रम्प
Published on
Updated on

एव्हियान (फ्रान्स) : भारतासोबत आमचे संबंध केवळ करारांपुरते मर्यादित नाहीत. दोन्ही देशांमध्ये मजबूत संरक्षण भागीदारी आहे. कोणीही भारतावर हल्ला केला आणि नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत असतील, तर आम्ही हल्लेखोरांविरोधात कारवाई करू, दुसरा कोणी नेतृत्व करत असेल तर आम्ही विचार करू, असे थेट प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी येथे केले.

फ्रान्समधील एव्हियान येथे जी-७ शिखर परिषदेदरम्यान झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे जोरदार कौतुक केले.

जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारत प्रत्येक महत्त्वाच्या जागतिक प्रश्नात मोठी भूमिका बजावत राहील, असे सांगत ट्रम्प यांनी भारताला जागतिक राजकारणातील निर्णायक शक्ती म्हणून संबोधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारीला नव्या बळकटीचा संदेश मिळाल्याचे मानले जात आहे.

पश्चिम आशियातील परिस्थिती, भारत आणि अमेरिका व्यापार करार आणि सामरिक सहकार्य या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत भारत प्रत्येक महत्त्वाच्या जागतिक प्रश्नात मोठी भूमिका बजावेल, असे ट्रम्प म्हणाले.

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील चर्चेला वेग आल्याचे सांगितले. व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. मोदी अतिशय कठोर आणि कुशल वाटाघाटीकार आहेत. ते अत्यंत सौम्य आणि शांत दिसतात; मात्र चर्चा करताना ते अत्यंत ठाम भूमिका घेतात, असे ट्रम्प यांनी म्हटले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्यही अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दोन्ही देशांतील संबंध पूर्वीपेक्षा अधिक व्यापक आणि धोरणात्मक होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

खलाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या : पंतप्रधान मोदी

बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे. समुद्री व्यापार क्षेत्रात लाखो भारतीय खलाशी विविध देशांच्या जहाजांवर कार्यरत असून त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. अलीकडेच ओमान किनाऱ्याजवळील घटनेत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा त्यांनी थेट ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news