US Iran conflict | अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकले

ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे कुवेत, बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले
US Iran conflict |
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बहरीनमध्ये झालेले नुकसान.
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अंतरिम शांतता कराराचे उल्लंघन करत अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा एकदा भीषण हल्ले सुरू केले आहेत. यामुळे चार महिन्यांपासून चाललेले हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नसून, परिस्थिती चिघळली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर इराणला थेट लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर एका तासातच इराणने कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा अक्षरश: वर्षाव केला.

होर्मुझवर नियंत्रणाचा इराणचा प्रयत्न

या संपूर्ण युद्धाचे मुख्य केंद्र होर्मुझची सामुद्रधुनी हे आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने हा मार्ग रोखून धरला होता, ज्यामुळे शेकडो जहाजे खाडीत अडकून पडली होती. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या करारानंतर हा मार्ग खुला होताच कच्च्या तेलाच्या किमती घसरू लागल्या होत्या. मात्र, इराणला या सागरी मार्गावर पूर्ण नियंत्रण हवे असून तिथून जाणाऱ्या जहाजांवर कर आकारण्याची त्यांची योजना आहे, त्याला अमेरिकेचा विरोध आहे.

राजनैतिक चर्चा फिस्कटली

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेेर कालिबाफ यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये शांतता चर्चा झाली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणवरील काही निर्बंधही उठवले होते. मात्र, इराणने आरोप केला आहे की, अमेरिकेने कराराचा भंग केला असून त्यांच्या लष्करी हल्ल्यांमुळे आता सर्व राजनैतिक मार्ग बंद झाले आहेत.

लेबनॉनमध्येही युध्दबंदी नाही

इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या आक्रमणामुळे तिथली परिस्थितीही बिघडली आहे. अमेरिका-इराण करारानुसार लेबनॉनमध्ये युद्धबंदी लागू होणार होती, मात्र इस्रायली सैन्य मागे हटण्यास तयार नाही आणि हिजबुल्लाह शस्त्रे सोडण्यास तयार नाही तेथे युध्दबंदी करार होऊनही इस्रायलचे आक्रमण सुरूच असल्याने तणाव वाढला आहे.

कुवेत, बहरीनवर इराणचे हल्ले

इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने कुवेत आणि बहरीनवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात युद्धाचे ढग दाटले असून बहरीनमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कुवेती लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने शत्रूचे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले. बहरीनच्या गृह मंत्रालयाने नागरिकांना शांत राहून जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. इराणच्या या कपटपूर्ण हल्ल्यात मुहूर्खा प्रांतातील एका निवासी इमारतीचे नुकसान झाले आहे, सुदैवाने यात कोणाचाही जीव गेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news