

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना मात दिली. जेव्हा ७८ वर्षीय ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील; तेव्हा ते त्यांच्या मंत्रिमंडळासाठी उच्च दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जाणारे मूळ भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल (Kashyap 'Kash' Patel) यांची सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (CIA) च्या संचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांनी बाजी मारली असून ते आता दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. ऐतिहासिक विजयानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनातील संभाव्य उमेदवारांची एक यादी तयार केली आहे. यातून काश पटेल यांचे नाव सीआयएचे प्रमुख म्हणून पुढे आले आहे. ट्रम्प येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरु करतील.
रिपब्लिकन हाऊसचे माजी कर्मचारी असलेल्या काश पटेल यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण आणि गुप्तचर विभागातील विविध उच्च-स्तरीय पदांवर काम केले आहे. पटेल हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय राहिले. त्यांनी संरक्षण सचिव ख्रिस्तोफर मिलर यांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेल्या भारतीय स्थलांतरित कुटुंबात काश पटेल यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८० रोजी झाला. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या पटेल यांचे मूळ गुजरातमधील वडोदरा येथे आहे. त्यांनी रिचमंड विद्यापीठात पदवीपूर्व शिक्षण घेतले. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून आंतरराष्ट्रीय कायद्यातील प्रमाणपत्रासह कायद्याची पदवी मिळवली.
पटेल यांना सुरवातीला मोठ्या लॉ फर्ममध्ये काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी मियामी न्यायालयात जवळपास नऊ वर्षे खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांसह गुंतागुंतीची प्रकरणे हाताळली.
पटेल यांनी न्याय विभागात सरकारी वकील म्हणूनही काम केले. यादरम्यान त्यांनी अल-कायदा आणि ISIS सारख्या गटांशी संबंधित व्यक्तींचा तपास आणि खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड (JSOC) चे न्याय विभागाचे संपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.