

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले. परंपरेनुसार नवनिर्वाचित राष्ट्रपती २० जानेवारी २०२५ रोजी चार वर्षांच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो, असा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा सरकारी नोकर असतो आणि तो जनतेला उत्तरदायी असतो. त्याला देशाच्या सरकारी तिजोरीतून पगार दिला जातो. 'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पगार सरासरी देशवासीयांपेक्षा सहापट जास्त आहे. एक अमेरिकन सरासरी वार्षिक ६३ हजार ७९५ डॉलर (सुमारे ५३ लाख रुपये) कमवतो. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत वार्षिक सरासरी ७ लाख ८८ हजार डॉलर्स, म्हणजेच अंदाजे ६ कोटी २८ लाख रुपये कमवतात, परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पगार याच्या जवळपास निम्मा आहे. त्यानुसार ते देशातील टॉप १ टक्के श्रीमंतांमध्येही येत नाहीत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वार्षिक ४ लाख डॉलर्स म्हणजे ३.३६ कोटी रुपये वेतन मिळते. याशिवाय राष्ट्रपतींना अतिरिक्त ५० हजार डॉलर्स म्हणजेच ४२ लाख रुपये इतर खर्चासाठी मिळतात. वॉशिंग्टन डीसी मधील व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. इथे राहण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून काहीही खर्च करावा लागत नाही. जेव्हा राष्ट्रपती पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना एक लाख डॉलर्स म्हणजे सुमारे ८४ लाख रुपये दिले जातात. हा पैसा ते घराच्या सजावटीवर खर्च करू शकतात. राष्ट्रपतींना मनोरंजन, कर्मचारी आणि स्वयंपाकासाठी ६० लाख रुपये वार्षिक मिळतात.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सर्व आरोग्य सेवा मोफत आहेत. त्यांना प्रवासासाठी लिमोझिन कार, मरीन हेलिकॉप्टर आणि एअर फोर्स वन नावाचे विमान मिळते. राष्ट्रपतींच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या लिमोझिन कार आधुनिक सुरक्षा आणि दळणवळण यंत्रणांनी सुसज्ज आहेत. राष्ट्रपतींच्या पसंतीनुसार लिमोझिन कारमध्ये वेळोवेळी आवश्यक बदल केले जातात. गाड्या अधिक सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी त्यात बदलही केले जातात. वॉशिंग्टनमधील त्यांच्या अधिकृत निवासस्थानापासून ते विमानतळापर्यंत ते मरीन वन हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात.