

Pahalgam attack 2025
नवी दिल्ली : अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलत पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) ला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी ही माहिती दिली. रुबियो म्हणाले की, ही कारवाई राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेला दर्शवते. विशेष म्हणजे, ही तीच संघटना आहे जिने गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ते पुढे म्हणाले की, ही कारवाई अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादाविरुद्धचा लढा आणि भारतासोबतच्या सहकार्याचे प्रतीक आहे. TRF ला 'विशेष जागतिक दहशतवादी' (Specially Designated Global Terrorist) म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. TRF आणि त्याच्याशी संबंधित सर्व नावे आता लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) दहशतवादी यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून दिलेली पूर्वीची ओळखही कायम ठेवली आहे, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. २२ एप्रिल रोजी झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत सहा-सात मेच्या मध्यरात्री नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
TRF चा प्रमुख शेख सज्जाद गुल याला भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हटले आहे. TRF ने यापूर्वीही भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यात २०२४ मध्ये भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांचाही समावेश आहे.