

वॉशिंग्टन: अमेरिकेत iPhone विक्रीवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनमध्ये बनवलेल्या OLED डिस्प्लेच्या वापरावरून सुरू झालेल्या वादामुळे, अमेरिकेच्या इंटरनॅशनल ट्रेड कमिशन (ITC) ने प्राथमिक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, वादग्रस्त तंत्रज्ञान असलेल्या उत्पादनांच्या विक्री, वितरण आणि जाहिरातीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सध्याच्या स्टॉकवरही लागू होणार आहे.
अमेरिकेतील इंटरनॅशनल ट्रेड कमिशनने (ITC) आयफोनसह इतर उपकरणांवर बंदी लावण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई OLED डिस्प्लेमध्ये ट्रेड सीक्रेट चोरीच्या वादावरून झाली असून, चीनची BOE टेक्नॉलॉजी आणि सॅमसंग यांच्यात चाललेल्या तंत्रज्ञान वादामुळे संपूर्ण गोष्टीचा फटका Apple ला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चीनमधील BOE ही मोठी डिस्प्ले उत्पादक कंपनी Apple साठी iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16e या मॉडेल्ससाठी डिस्प्ले पॅनल पुरवते. तसेच आगामी iPhone 17 Pro साठीही BOE ला डिस्प्लेंच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. मात्र सॅमसंगने ITC कडे तक्रार केली होती की, BOE ने त्यांच्या तांत्रिक गोपनीय माहितीचा (Trade Secrets) गैरवापर केला आहे. या प्रकरणावर ITC ने ‘Cease and Desist’ म्हणजेच "वितरण, जाहिरात आणि विक्रीवर त्वरित बंदी" असा प्राथमिक आदेश जारी केला आहे. हा आदेश उपलब्ध स्टॉकवरही लागू असेल. त्यामुळे BOE च्या डिस्प्ले असलेल्या iPhone मॉडेल्सवर अमेरिकेत तात्पुरती बंदी लागू होऊ शकते. शिवाय, ITC ने लिमिटेड एक्सक्लूजन ऑर्डरही दिला आहे, ज्यामुळे चीनमधून अमेरिकेत या iPhone मॉडेल्सचा आयातही रोखला जाऊ शकतो.
हा वाद सॅमसंग आणि BOE या कंपन्यांमध्ये OLED तंत्रज्ञानाच्या ट्रेड सिक्रेट चोरीवरून सुरू आहे. या प्रकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम Apple वरही होऊ शकतो. मात्र, Apple ने या बातम्यांना फेटाळले असून, "Apple या प्रकरणात पक्षकार नाही आणि ITC चा आदेश कोणत्याही Apple उत्पादनावर परिणाम करत नाही," असे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या तरी, चिनी डिस्प्ले असलेल्या iPhone मॉडेल्सच्या विक्रीवर आणि आयातीवर अमेरिकेत बंदी येण्याची शक्यता आहे, मात्र Apple ने ग्राहकांना कोणताही तातडीचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी “Made in America” धोरणावर भर दिला असला तरी, अनेक जागतिक कंपन्यांना पूर्णतः अमेरिकेत उत्पादन करणं अजूनही अवघड वाटत आहे. BOE सारख्या चिनी कंपन्यांवर बंदी आल्यास Apple ला भारत किंवा कोरियासारख्या इतर देशांतून पर्याय शोधावा लागणार आहे.
ITC चा अंतिम निर्णय नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे. हा निर्णय कायम राहिल्यास, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन महिन्यांत या आदेशावर व्हेटो वापरू शकतात.जर व्हेटो वापरला नाही, तर BOE डिस्प्ले असलेले iPhone मॉडेल्स अमेरिकेतून हद्दपार होतील. Apple आणि iPhone चाहत्यांसाठी ही काळजीची बाब असली, तरी सध्या Apple ने खात्री दिली आहे की याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादनांवर होणार नाही. मात्र ITC चा अंतिम निर्णय आणि राष्ट्राध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान iPhone युजर्संनी पुढील काही महिन्यांत होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.