

US Congressman Ro Khanna : भारताने पाकिस्तान व पाक व्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ वेगवेगळ्या दहशतवादी तळांवर बुधवारी (दि. ८ मे) पहाटे क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. या कारवाईला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव असून, ही मोहिम सुरुच असल्याचे आज (दि. ८) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची वल्गना करत पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाचे खासदार रो खन्ना यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘हुकूमशहा’ म्हणत पाकिस्तानने भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याची चूक करू नये, असा इशारा दिला आहे.
'सीएनएन'शी बोलताना रो खन्ना म्हणाले, “ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तणाव कमी करणे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिक मारले गेले. भारताची ही कारवाई काही दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यास कारणीभूत ठरली. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती शांत ठेवणे आहे."
अमेरिका भारत-पाकिस्तानमधील या गंभीर स्थितीला समजून घेऊन राजनैतिक मार्गाने सोडवण्यात मदत करावी. “ब्रिटिशांनी फाळणी आणि हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक मतभेद वाढवले. या भागातील गुंतागुंतीचे मुद्दे समजून घेऊन आपण प्रामाणिक मध्यस्थाची भूमिका घ्यायला हवी,” असेही रो खन्ना यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानमध्ये लोकशाही जवळजवळ संपली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे हुकूमशहा आहेत. त्यांनी कोणताही वैध निवडणूकप्रक्रिया पार पाडलेली नाही. त्यांनी इम्रान खान यांना तुरुंगात टाकले आहे. तेथील राजकारणात आता कोणतीही प्रामाणिक आवाज राहिलेली नाही. अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणावा. आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज पुरवतो, ते त्यावर अवलंबून आहेत. इम्रान खान यांना सोडण्यात यावे, कोणताही प्रत्युत्तरात्मक हल्ला होऊ नये आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी ट्रम्प सरकारकडे केली आहे.
यापूर्वी अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष जिम रिश यांनीही भारताला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांनी भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव चिंताजनक आहे. मी पहलगामच्या हल्लेखोरांविरोधात न्यायासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो, पण दोन्ही देशांनी नागरिकांविषयी सावधगिरी आणि आदर ठेवावा,” असे त्यांनी 'एक्स' वर म्हटले आहे.