

Global Conflict 2025
वॉशिंग्टन : इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या थेट सहभागानंतर प्रादेशिक अस्थिरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची मॉस्कोवारी पोहोचले असून, ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची उद्या सकाळी भेट घेणार आहेत. रशिया आमचा दीर्घकालीन मित्र आहे; निर्णायक सल्लामसलत करणार, असे अरागची यांनी रवाना होण्यापूर्वी स्पष्ट केले.
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व पुतीन यांचे विश्वासू सहयोगी दिमित्री मेदवेदेव यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर सलग पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर आता अनेक देश इराणला स्वतःची अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत. वॉशिंग्टनचे मिशन फसले असून त्याचे उलटेच परिणाम दिसत आहेत.
अमेरिकेने सर्वच लक्ष्मणरेखा ओलांडल्या आहेत. आमच्या अणुस्थळांवर हल्ल्यानंतर कोणताही राजनैतिक मार्ग शिल्लक राहिलेला नाही. आम्ही पुढे जे काही पाऊल उचलू, त्याची पूर्ण जबाबदारी वॉशिंग्टनवर असेल. त्यांनी अमेरिकेच्या ‘युद्धोन्मादी, अराजक’ धोरणावर टीका करत संभाव्य ‘दूरगामी परिणामां’चा इशारा दिला.
तज्ज्ञांचा अंदाज : मध्य पूर्वेतील तणावाच्या काट्यावर सध्या सर्वांत जास्त भार अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनी आणि रशियाच्या संभाव्य प्रत्युत्तराने निर्माण केला आहे. उद्याच्या बैठकीतून नेमके काय ठरते, यावर पुढील आठवड्यातील घडामोडींचे ‘थर्मामीटर’ अवलंबून राहील. जागतिक सामर्थ्यांनी संयम पाळावा, अन्यथा तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर मानवता उभी राहू शकते, अशी सज्जड भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
चीनने आधीच अमेरिकी कारवाईचा निषेध केला आहे. आता रशियाही उघडपणे इराणच्या मदतीला धावल्यास, संघर्षाचे परिमाण जागतिक स्तरावर जाण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
रशियाकडून अण्वस्त्र पुरवठ्याचा इशारा प्रत्यक्षात आला, तर तिसर्या महायुद्धाचे ढग अधिक गडद होऊ शकतात, असा अंदाज मध्य पूर्व विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
अरागची-पुतीन बैठकीकडे जागतिक लक्ष; संरक्षण सहकार्याविषयी घोषणा होण्याची शक्यता.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी वाढू शकते.
इस्रायल-अमेरिका आघाडी आणि इराण-रशिया-चीन ध्रुवीकरण बुजबुजण्याची चिन्हे.
हल्ल्यानंतर चीनही सक्रिय झाला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्रिपक्षीय बैठकीस बोलावले. अफगाण परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काँटॅक्ट ग्रुप काबूलमध्येही सत्र घेणार आहे.
मॉस्को - अरागची-पुतीन बैठकीनंतर संयुक्त निवेदनाची शक्यता.
बीजिंग/- चीन-पाकिस्तान-अफगाणिस्तान चर्चेत सुरक्षा व मानवी मदत यावर भर येणार.
यूएन सुरक्षा परिषद - आपत्कालीन सत्र बोलावण्याची चर्चा सुरू.
जागतिक शक्तींच्या या जलद हालचालींमुळे मध्य-पूर्वेतील संघर्षाचा पट व्यापक होत असून, राजनैतिक तोडगा काढण्याचा दबावही तितकाच वाढला आहे.
रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्रामवर लिहिले, शांती प्रस्थापित करण्याचा दावा करणार्या ट्रम्प यांनी अमेरिकेची नवी लढाई सुरू केली आहे. त्यांचा आरोप आहे की अमेरिकेचा अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ला परिस्थिती अधिक धोकादायक करीत आहे.