

UAE loan to Pakistan US-Israel-Iran War
इस्लामाबाद: अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरुद्ध छेडलेल्या युद्धामुळे आखाती राष्ट्रे खिळखिळी झाली आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमधून होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला दिलेले २ अब्ज डॉलरचे कर्ज तातडीने परत मागितले आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत असलेल्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे सौदी अरेबिया आणि युएई यांसारख्या देशांचा तेल आणि वायू पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यातच इराणकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे या देशांच्या सुरक्षेचा आणि आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बिकट परिस्थिती पाहता, युएईने आता इतर देशांना दिलेली कर्जे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे युएईने पाकिस्तानला दिलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी ती तातडीने परत मागितली आहे.
युएईने दिलेले हे कर्ज पाकिस्तानच्या 'बॅलन्स ऑफ पेमेंट'ला आधार देण्यासाठी दिले होते. ही रक्कम 'स्टेट बँक ऑफ पाकिस्तान'मध्ये ठेव म्हणून सुरक्षित ठेवण्यात आली होती, ज्यावर पाकिस्तान ६ टक्के व्याज देत होता. दरवर्षी युएई या कर्जाची मुदत वाढवून देत असे. मात्र, यावेळी डिसेंबर २०२५ मध्ये केवळ एक-दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली, ज्याची अंतिम मुदत १७ एप्रिल रोजी संपत आहे.
चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानला सौदीकडून ५ अब्ज डॉलर, चीनकडून ४ अब्ज डॉलर आणि युएईकडून ३ अब्ज डॉलर अशा एकूण १२ अब्ज डॉलरच्या परकीय कर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक होते.
सध्या पाकिस्तानकडे २१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त विदेशी चलन साठा असल्याने ते युएईचे कर्ज फेडण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही मोठी रक्कम परत केल्यामुळे पाकिस्तानच्या गंगाजळीत घट होईल, परिणामी येणाऱ्या काळात त्यांना पुन्हा एकदा जागतिक वित्तीय संस्थांकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरावे लागण्याची शक्यता आहे.