Mount Everest Helicopter Crash Video: काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं! माउंट एव्हरेस्टजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; एकाचा मृत्यू

Mount Everest Helicopter Crash Video: नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट परिसरातील फेरिचे येथे लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसून अपघात झाला.
Mount Everest Helicopter Crash Video
Mount Everest Helicopter Crash VideoPudhari
Published on: 
Updated on: 

Mount Everest Helicopter Crash Video: नेपाळमधील जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट परिसरात मंगळवारी सकाळी मोठा अपघात घडला. फेरिचे येथे दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकले. या धडकेनंतर दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. या अपघातात एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला असून एक पायलट जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

हा अपघात नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील बर्फाच्छादित भागात झाला. माउंट एव्हरेस्ट परिसरात पर्यटकांची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशाच एका उड्डाणादरम्यान ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दोन हेलिकॉप्टर फेरिचे येथील हेलिपॅडवर उतरण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी दोन्ही हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक झाली. त्यानंतर दोन्ही हेलिकॉप्टर कोसळले.

फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टीच्या हेलिकॉप्टरची धडक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या दोन कंपन्यांच्या हेलिकॉप्टरचा समावेश आहे. फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या एका परदेशी पर्यटकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र, मृत पर्यटकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Mount Everest Helicopter Crash Video
Bangladesh Workers Protest | बांगला देशात कामगारांचा उद्रेक; महामार्ग रोखून वाहनांची जाळपोळ

फिशटेल एअरचे हेलिकॉप्टर कॅप्टन प्रज्ज्वल केसी चालवत होते. तर एअर डायनेस्टीच्या हेलिकॉप्टरची जबाबदारी कॅप्टन रवींद्र प्रजापती यांच्याकडे होती. या अपघातात कॅप्टन रवींद्र प्रजापती जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बचावकार्य सुरू, अपघाताचा तपास होणार

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सिमरिक एअरचे एक हेलिकॉप्टरही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. जखमींना मदत करण्यासोबतच अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Mount Everest Helicopter Crash Video
US attack Iran: अमेरिकेचा इराणवर गुप्त लष्करी हल्ला; केशम बेटावर मोठा स्फोट, अणुयुद्धाची शक्यता

दरम्यान, दोन्ही हेलिकॉप्टरची धडक नेमकी कशामुळे झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. लँडिंगच्या वेळी दोन्ही हेलिकॉप्टर एकाच वेळी जवळ आल्याने हा अपघात झाला का, याचा तपास केला जात आहे. अधिकारी या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत.

माउंट एव्हरेस्ट परिसरात पर्यटन आणि गिर्यारोहणासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. त्यामुळे या भागात हेलिकॉप्टर वाहतूक महत्त्वाची मानली जाते. मात्र, या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा डोंगराळ आणि बर्फाच्छादित भागातील हेलिकॉप्टर प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.