

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या कराचीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी रात्री स्फोट झाला. यात चीनच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला, अशी पुष्टी पाकिस्तानमधील चीनच्या दूतावासाने केली आहे. हा दहशतवादी हल्ला असून या स्फोटाची जबाबदारी फुटीरतावादी दहशतवादी गट बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने घेतली आहे. त्यांनी इंजिनिअर्ससह चीनच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वाहनात स्फोटक डिव्हाईसचा वापर केला.
या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून किमान १० लोक जखमी झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. चीनच्या दूतावासाने एक निवेदन जारी करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी चीन नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानमधील चीनचे दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत दोन्ही देशांतील निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे," असे निवेदनात नमूद केले आहे.
उपमहानिरीक्षक पूर्व अजफर महेसर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की या स्फोटात्या घटनेत तेलाच्या टँकरचा वापर करण्यात आल्याचे दिसते. "आम्ही स्फोटाचे कारण आणि परिस्थिती याचा तपास करत आहोत. त्यासाठी थोडा वेळ लागेल," असे ते म्हणाले. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
चीन दूतावासाच्या निवेदनानुसार, पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (प्रायव्हेट) लिमिटेडच्या चिनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हल्ला झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. या हल्ल्यात काही पाकिस्तानी नागरिकही जखमी झाले आहेत. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ आणि फोटोंमध्ये कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसते. घटनास्थळी आग आणि धुराचे लोट दिसून आले आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली. याबाबत ईमेलच्या माध्यमातून निवेदन जारी करण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या गटाने म्हटले आहे की हा स्फोट त्यांनी इंजिनिअर्ससह चीन नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी केला होता. पाकिस्तानच्या नैऋत्येस आणि अफगाणिस्तान, इराणच्या सीमेला लागून बलुचिस्तान प्रांत आहे. बलूच लिबरेशन आर्मीची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आहे.