

Turkey Provides Drones to Pakistan:
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या चार दिवसीय संघर्षात तुर्कीएने पाकिस्तानला मोठी लष्करी मदत केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. तुर्कीएने पाकिस्तानला 350 हून अधिक ड्रोन पुरवले असून, दोन तुर्की लष्करी अधिकारी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारले गेल्याचेही समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कीए सरकारने केवळ ड्रोनच पुरवले नाहीत, तर आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनाही पाकिस्तानमध्ये पाठवून भारताविरुद्ध ड्रोन हल्ले करण्यास मदत केली. तुर्की सल्लागारांनी पाक लष्कराला ड्रोन वापराचे मार्गदर्शन दिले असल्याचेही उघड झाले आहे.
पाकिस्तानने Bayraktar TB2 आणि YIHA प्रकारचे ड्रोन भारताविरुद्ध वापरले आहेत. हे ड्रोन लक्ष्य निश्चित करण्यासाठी तसेच आत्मघातकी हल्ल्यांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे. हे हल्ले विशेषतः सीमावर्ती भारतीय लष्करी तळांवर आणि पुरवठा मार्गांवर केंद्रित होते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, 7 व 8 मेच्या रात्री दरम्यान, पाकिस्तानने 300–400 ड्रोन वापरून भारताच्या उत्तर व पश्चिम सीमेवरील लष्करी रचनेवर लक्ष्य केले.
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “हल्ल्यात वापरलेले ड्रोन हे तुर्कीच्या Asisguard Songar प्रकारचे असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. या ड्रोनपैकी अनेकांना भारतीय लष्कराने प्रत्यक्ष हल्ल्यांद्वारे आणि इलेक्ट्रॉनिक उपायांनी निष्प्रभ केले.”
या मोठ्या प्रमाणातील ड्रोन हल्ल्यांचा उद्देश भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणांची चाचणी घेणे आणि गुप्त माहिती मिळवणे असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तुर्कीएने पाकिस्तानला दिलेल्या लष्करी पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तुर्कीएतील सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या 'TRT' चे X (माजी ट्विटर) वरील खाते ब्लॉक केले आहे.
भारताच्या लष्कराने सांगितले की पाकिस्तानने लेहपासून सिरी क्रीकपर्यंत 36 ठिकाणी तुर्की बनावटीच्या ड्रोनने हल्ले केले.
दरम्यान, भारताने चीनच्या Xinhua आणि Global Times या सरकारी माध्यमांचे X वरील अकाऊंट देखील चुकीची माहिती व पाकिस्तानची बाजू मांडल्यामुळे बंद केले आहेत.