

अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावाचे आहेत. १९६० च्या दशकात फिडेल कॅस्ट्रो यांच्या कार्यकाळात हे संबंध बिघडले. यानंतर अमेरिकेने क्युबावर कडक आर्थिक निर्बंध लादले होते.
Trump Venezuela attack
वॉशिंग्टन: व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्यानंतर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारने दक्षिण अमेरिकेतील इतर देशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी क्युबाच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे. "व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेनंतर मी जर क्युबा सरकारमध्ये असतो, तर नक्कीच चिंतेत पडलो असतो," अशा शब्दांत रुबिओ यांनी धमकी दिली आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ म्हणाले की, "क्युबा सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हा देश एका अकार्यक्षम सरकारद्वारे आणि एका वृद्ध व्यक्तीकडून चालवला जात आहे. तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेष म्हणजे, मादुरो यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सर्व रक्षक क्युबाचेच होते. एक प्रकारे क्युबाने व्हेनेझुएलावर ताबा मिळवून त्याला आपली वसाहत बनवण्याचा प्रयत्न केला होता. सध्याची परिस्थिती पाहता, मी हवानामध्ये (क्युबाची राजधानी) सरकारचा भाग असतो, तर या घडामोडींमुळे नक्कीच चिंतेत असतो."
अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावाचे आहेत. १९६० च्या दशकात फिडेल कॅस्ट्रो यांच्या कार्यकाळात हे संबंध बिघडले. यानंतर अमेरिकेने क्युबावर कडक आर्थिक निर्बंध लादले होते. बराक ओबामा यांच्या काळात हे संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले; परंतु ट्रम्प आणि बायडेन यांच्या कार्यकाळात त्यात पुन्हा कटुता आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही क्युबावर टीका करताना त्याला 'अपयशी राष्ट्र' (Failed Nation) संबोधले आहे. क्युबातील नागरिक आणि देश सोडून गेलेल्या लोकांना मदत करणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प म्हणाले की, "क्युबामधील स्थिती अत्यंत वाईट आहे. नेक वर्षांपासून तिथले लोक हालअपेष्टा सहन करत आहेत. क्युबा हा एक असा विषय आहे ज्यावर आम्ही भविष्यात नक्कीच चर्चा करू, कारण ते एक अपयशी राष्ट्र आहे. आम्हाला तिथल्या जनतेला मदत करायची आहे."
अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांनी एका संयुक्त मोहिमेद्वारे शनिवारी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली. त्यांना अटक करून अमेरिकेत नेण्यात आले आहे. अमेरिकेच्या ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, अंमली पदार्थांची तस्करी आणि 'नार्को-टेररिझम'चा कट रचल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.