

Donald Trump on India Pakistan war : "मे २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू झालेले युद्ध मीच थांबवले. यावेळी ३ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माझे आभार मानले," असा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केला.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८१ व्या अधिवेशनात बोलताना ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे ‘उत्तम व्यक्ती’ असे वर्णन केले. ट्रम्प म्हणाले की, युद्ध थांबवल्याबद्दल आणि ‘३ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल’ त्यांनी माझे आभार मानले होते. ज्या देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी आपण हस्तक्षेप केला, त्या देशांच्या नेत्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला पत्रे लिहिल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. त्यानंतर काही दिवस लष्करी तणाव वाढला होता आणि मे २०२५ मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. मात्र, भारताने हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. भारताच्या मते, हा युद्धविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यात परस्पर सहमतीने झाला होता आणि यात कोणत्याही त्रयस्थ पक्षाचा मध्यस्थीसाठी सहभाग नव्हता.
जुलैमध्ये, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम घडवून आणल्याचा दावा पुन्हा केला होता. त्यांनी म्हटले होते की, हा संघर्ष ‘अण्वस्त्र युद्धा’त बदलू शकला असता कारण ११ विमाने पाडण्यात आली होती आणि लाखो लोकांचे प्राण जाऊ शकले असते. आपण नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहोत, असेही त्यांनी जोडले होते. एप्रिल २०२६ मध्येही त्यांनी असेच विधान केले होते आणि आपण ३ ते ५ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे म्हटले होते. "मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षासह एकूण आठ युद्धे थांबवली; इतकेच काय, तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला सांगितले की, मी ३ ते ५ कोटी लोकांचे प्राण वाचवले," असे ट्रम्प यांनी त्यावेळी म्हटले होते.