

Donald Trump UN speech Iran warning : "इराण आता मध्य पूर्वेतील दादागिरी करणारा देश राहिलेला नाही. या देशाबाबत आम्हाला मोठा निर्णय घ्यायचा आहे. या देशसोबत करार करणे किंवा या इस्लामिक प्रजासत्ताकाचा "पूर्ण नायनाट" करणे," अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आज (दि. २२ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना इशारा दिला.
यावेळी ट्रम्प म्हणाले की, शांतता करारामुळे इराणला पुनर्बांधणी करण्याची आणि मध्यपूर्वेतील किंवा जगातीलही "सर्वात महान" देशांपैकी एक बनण्याची संधी मिळू शकते. मात्र, "पुन्हा हत्या आणि विध्वंस" करण्याची कोणतीही संधी नाकारली जाऊ शकते.
"मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. इराणसोबत असा करार करायचा का ज्यामुळे त्यांना पुनर्बांधणी करता येईल आणि पूर्वीपेक्षाही अधिक महान देश घडवता येईल.कदाचित मध्यपूर्वेतील किंवा जगातील सर्वात महान देशांपैकी एक? की मग मी या इस्लामिक प्रजासत्ताकाचा नायनाट करू आणि तोही त्वरीत, जेणेकरून त्यांना पुन्हा हत्या आणि विध्वंस करण्याची संधीच मिळणार नाही? त्यांना नरकात धाडून देऊ का, जिथे जगण्याची कोणतीही शक्यता किंवा भविष्यातील महानतेची कोणतीही आशा उरणार नाही?" अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली.
"व्यापारी जहाजांवरील इराणच्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव मोठ्या बहुमताने मंजूर केल्याबद्दल मी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे आभार मानू इच्छितो., सुरक्षा परिषदेच्या इतिहासातील इतर कोणत्याही ठरावापेक्षा या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांकडून सर्वाधिक सह-प्रायोजक मिळाले. आता, दबाव कायम ठेवण्याच्या बाबतीत आपण तितकेच एकजूट राहिले पाहिजे," असे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर, इराणला अणुशस्त्र विकसित करण्यापासून रोखण्याच्या बाजूने युक्तिवाद करताना ट्रम्प यांनी अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ चे हल्ले आणि इस्रायलमधील ७ ऑक्टोबर २०२३ चा हल्ला यांचा संदर्भ दिला. "अमेरिकेत आम्ही नुकतीच इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्याचे ११ सप्टेंबर रोजी स्मरण केले. या हल्ल्यात ३,००० लोकांचा बळी गेला होता. दोन आठवड्यांत आम्ही इस्रायलमधील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची तिसरे वर्ष असेल. या हल्ल्यात इराणकडून अर्थपुरवठा होणाऱ्या दहशतवाद्यांनी डझनभर अमेरिकन नागरिकांसह १,२०० निष्पाप नागरिकांचा छळ केला, त्यांची विटंबना केली आणि त्यांची हत्या केली," असेही ट्रम्प यावेळी म्हणाले