

पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पोलंड दौर्यावेळी ( PM Modi Poland Visit) वॉर्सा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी युक्रेन भेटीच्या आधी या प्रदेशात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेबद्दल पुन्हा एकदा आश्वस्त केले. पीएम मोदी यांनी "हे युद्धाचे युग नाही" या त्यांच्या विधानाचा पुनरुच्चारही केला आणि त्यांनी मानवतेच्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ऐक्याचे आवाहन केले.
“भारत ही भगवान बुद्धांचा वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारत युद्धावर विश्वास ठेवत नाही आणि भारत या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा पुरस्कर्ता आहे. भारताची भूमिका स्पष्ट आहे; हे युद्धाचे युग नाही आणि मानवतेच्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतो'', असे पीएम मोदी म्हणाले.
यावेळी सर्व देशांशी समान संबंध राखण्याबाबतची भारताची भूमिका पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केली. आजचा भारत विकासावर लक्ष केंद्रित करून सर्वांच्या हिताचा विचार करून सर्वांशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक दशकांपासून भारताचे सर्व देशांपासून अंतर राखण्याचे धोरण राहिले आहे. पण, आजच्या भारताचे धोरण सर्व देशांशी समान संबंध साधण्याचे आहे. आजच्या भारताला सर्वांशी जोडायचे आहे. आजचा भारत सर्वांच्या विकासाची चर्चा करतो. आजचा भारत सर्वांसोबत आहे आणि सर्वांच्या हिताचा विचार करतो,” असे ते म्हणाले.
पीएम मोदी पोलंडनंतर राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून युक्रेन दौऱ्यावर जात आहेत. १९९१ मध्ये युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमधील भेटीनंतर सुमारे सहा आठवड्यांनंतर पीए मोदी युक्रेन दौऱ्यावर जात आहेत.
पीएम मोदी यांनी पोलंड दौर्यावेळी वर्सोवा येथील कोल्हापूर संस्थानच्या महाराजांच्या स्मारकास श्रद्धांजली अर्पण केली. दुसर्या महायुद्धात हुकूमशहा हिटलर याच्या छळछावण्यांमुळे पोलंडमधील सहा हजारांवरून महिला आणि मुलांनी कोल्हापूर आणि गुजरातमधील तत्कालीन नवानगर संस्थानात आश्रय घेतला होता. पोलंड दौर्यात पीएम मोदी यांनी नवानगर आणि कोल्हापूरच्या नातेसंबंधांना उजाळा दिला. मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कोल्हापूर आणि पोलंडच्या भावस्पर्शी नातेसंबंधांची माहिती दिली.