वर्सोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौर्यावेळी वर्सोवा येथील कोल्हापूर संस्थानच्या महाराजांच्या स्मारकास श्रद्धांजली अर्पण केली. दुसर्या महायुद्धात हुकूमशहा हिटलर याच्या छळछावण्यांमुळे पोलंडमधील सहा हजारांवरून महिला आणि मुलांनी कोल्हापूर आणि गुजरातमधील तत्कालीन नवानगर संस्थानात आश्रय घेतला होता. पोलंड दौर्यात मोदी यांनी नवानगर आणि कोल्हापूरच्या नातेसंबंधांना उजाळा दिला. मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कोल्हापूर आणि पोलंडच्या भावस्पर्शी नातेसंबंधांची माहिती दिली.
कोल्हापूर संस्थानच्या महाराजांनी दुसर्या महायुद्धात पोलंडमधील महिला आणि मुलांना आश्रय दिल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे वर्सोवातील स्मारकावर कोरले आहे. मोदी यांनी या स्मारकासमोर नतमस्तक होत कोल्हापूर आणि नवानगराच्या महाराजांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवानगरचे (सध्याचे नाव जामनगर, गुजरात) जामसाब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी यांच्या स्मारकास भेट देऊन आदरांजली वाहिली. दुसर्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील महिला आणि बालकांना त्यांनी गुजरातमधील नवानरगरमध्ये आश्रय दिला होता. त्यांच्या स्मरणार्थ वर्सोवातील गुड महाराजा स्क्वायर या ठिकाणी पोलंड सरकारने स्मारक बनविले आहे. डोब्रेगो महाराजा या नावानेही हे स्मारक परिचित आहे. याच ठिकाणी मोदी यांनी मॉन्टे कॅसिनो आणि कोल्हापूरच्या स्मारकास भेट देऊनश्रद्धांजली वाहिली.