Tel Aviv missile attack |
जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला. यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे.
आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले.
इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एक क्षेपणास्त्र तेल अवीवमध्ये पडले. ही घटना इराणी हल्ल्यामुळे झाली की इस्रायलच्या संरक्षणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गंभीर परिस्थितीत, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे की जर त्यांनी अणुकरारावर स्वाक्षरी केली नाही तर मोठा हल्ला केला जाईल.
सायरनचा थरार: इस्रायलची प्रमुख शहरे तेल अवीव आणि जेरुसलेम पहाटे हवाई हल्ल्यांच्या सायरनने दणाणून गेली. नागरिकांनी तातडीने सुरक्षित आश्रयस्थानांकडे धाव घेतली.
हवाई संरक्षण सज्ज: इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी इस्रायली लष्कराची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
क्षेपणास्त्रांचा वर्षाव: इराणमधून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी अनेक हवेतच नष्ट करण्यात यश आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
नुकसान आणि जीवितहानी: तेल अवीवमध्ये एका उंच इमारतीला क्षेपणास्त्राचा तडाखा बसला, तर रमात गानमध्ये एक अपार्टमेंट इमारत जमीनदोस्त झाली. या हल्ल्यांमध्ये ३४ जण जखमी झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शोध आणि बचाव कार्य: क्षेपणास्त्रांचे अवशेष पडलेल्या ठिकाणी बचाव पथके तातडीने दाखल झाली आहेत.
तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज: इराणची राजधानी तेहरानमध्येही अनेक ठिकाणी स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
विमानतळाला लक्ष्य: तेहरानच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन क्षेपणास्त्रे आदळल्याने आग लागल्याचे वृत्त आहे. हे विमानतळ इराणच्या महत्त्वाच्या लष्करी तळांपैकी एक आहे.
प्रत्युत्तरादाखल हल्ले: इस्रायलने शुक्रवारी इराणमधील लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि महत्त्वाच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने ही कारवाई केल्याचे समजते. शनिवारी इराणने हल्ल्यांची तिसरी लाट सुरू केली.