

Iran espionage arrests
तेहरान : इराणने अमेरिकेसोबत व इस्रायलसोबत झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर देशभरात व्यापक पातळीवर गुप्तहेर शोध मोहीम (Counter-Espionage Campaign) सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत देशभरात विविध ठिकाणी पोलिस छाप्यांदरम्यान 21,000 पेक्षा अधिक जणांना अमेरिकेसोबत व इस्रायलसोबत गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
या अटकेत सामान्य नागरिक, शास्त्रज्ञ, अणुउर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर, अभियंते आदींचा समावेश आहे. इराणच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रवक्ते सईद मोंताझेरोलमहदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल व अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर नागरिकांकडून संशयितांविषयी मिळालेल्या तक्रारींमध्ये 41 टक्के वाढ झाली असून त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.
इराणने सात जणांना इस्रायलसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपावरून फाशी दिली आहे. यात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ रौजबेह वादी यांचा समावेश असून त्यांना 6 ऑगस्ट 2025 रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्यावर इस्रायली गुप्तचर संस्था 'मोसाद'ला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप होता.
याशिवाय इद्रिस अली, आजाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल या तीन कुर्द नागरिकांनाही 25 जून 2025 रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्यावर 2020 मध्ये झालेल्या इराणी अणुशास्त्रज्ञ मोसेन फक्रिजादेह यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता.
इस्रायलने अलीकडेच ‘रायझिंग लायन’ (Rising Lion) नावाची मोहीम राबवत इराणमधील अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले.
या कारवाईत 20 वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि 14 अणुशास्त्रज्ञ ठार झाले, तसेच 974 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आणि 1484 जण जखमी झाले. याशिवाय, इराणच्या अणु सुविधा देखील या हल्ल्यांतून मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या.
इस्रायली हल्ल्यांनंतर इराणमध्ये अफगाण निर्वासितांविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर गुप्तहेरगिरीचे आरोप लावून त्यांना मोठ्या प्रमाणावर देशातून हाकलले जात आहे. यामुळे अफगाणिस्तानमधील आधीच असलेली मानवी संकटाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
UN Refugee Agency च्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत 13 लाखांहून अधिक अफगाण निर्वासितांनी इराणमधून परतावे लागले असून वर्षाअखेरपर्यंत हा आकडा 30 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. दररोज 30,000 ते 50,000 निर्वासित इस्लाम काला सीमा ओलांडून परतत आहेत.
काही कुटुंबांना रातोरात देश सोडावा लागत असून त्यांच्याकडे फक्त अंगावरील कपडेच असतात. महिलांची आणि लहान मुलांची स्थिती फारच दयनीय आहे. काही महिला एका चपलेत परतत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अलीकडेच अफगाणिस्तानासाठी सुरू असलेल्या 22 मदत योजनांमध्ये 8580 कोटी रुपयांची (अंदाजे) कापणी केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
तालिबानच्या राजवटीखाली परतलेल्या महिलांना शिक्षण, नोकरी व मुक्त हालचालींवर कडक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये आधीच 23.7 दशलक्ष नागरिक – म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक – मानवी मदतीवर अवलंबून आहेत.
बेरोजगारी उच्चतम स्तरावर पोहोचली आहे, बँकिंग व्यवहारांवरील निर्बंधांमुळे व्यापार आणि आयात ठप्प झाली आहे, तर परदेशातून येणाऱ्या रकमा (remittances) कमी झाल्यामुळे सामान्य जनतेवर मोठा परिणाम झाला आहे.