पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन दिवसांमध्ये स्पेनमध्ये पाऊस आणि वादळाने हाहकार माजवला आहे. या झालेल्या पावसात आणि वादळामुळे 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच वादळाच्या तीव्र स्वरूपामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे सरकार कडून बंद ठेवली आहेत. दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली आहे.
या दिवसांत पाऊस आणि वादळामुळे स्पेनमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. त्यामुळे अनेक लोक बेघर झाले असून आतापर्यंत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अजूनही तळघर आणि खालच्या मजल्यावर अनेक लोक अडकले आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला या वादळाचा आणि मुसळधार पावसाचा अधिक फटका बसल्याचे दिसत आहे. व्हॅलेन्सियामध्ये मागील 28 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस या दिवसांत पडला आहे.
स्पेनमधील भीषण परिस्थिती पाहता, सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी दिले आहे तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, सध्या दाना वादळाचा धुमाकुळ सुरू आहे. कृपया आपत्कालीन सेवांच्या शिफारशींकडे लक्ष द्या. सध्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचे रक्षण करणे. ते पुढे म्हणाले की, स्पेन सरकार पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. पुनर्बांधणी आणि सामान्य स्थितीत परत येण्यासाठी सर्व संभाव्य संसाधने आणि साधनांसह. जितक्या लवकर तितके चांगले.
सीएनएनच्या अहवालानुसार, स्पेनमध्ये अतिवृष्टी आणि वादळामुळे बहुतेक मृत्यू व्हॅलेन्सियामध्ये झाले आहेत, जे भूमध्य सागरी किनारपट्टीवर आहे आणि जिथे 50 लाखांहून अधिक लोक राहतात. गंभीर परिणाम लक्षात घेता, मद्रिद आणि व्हॅलेन्सिया दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुवारी देखील, वलेन्सियातील शाळा, संग्रहालये आणि सार्वजनिक ग्रंथालये तसेच प्रभावित भागातील इतर सार्वजनिक सेवा बंद होत्या.
तज्ज्ञांच्या मते, मुसळधार पावसाचे कारण म्हणजे थंड आणि उष्ण वाऱ्यांच्या संयोगाने दाट ढगांची निर्मिती. हे ढग मुसळधार पावसाचे कारण बनले. अलीकडच्या काळात जगात अनेक ठिकाणी या प्रक्रियेमुळे अतिवृष्टी आणि विध्वंसाच्या घटना घडल्या आहेत. स्पॅनिशमध्ये याला 'दाना' प्रभाव म्हणतात.