पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेनच्या पूर्व भागात अचानक विनाशकारी पुराचा तडाखा बसला. या पुरात आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक शहरांमध्ये रस्ते जलमय झाले होते, गाड्या वाहून गेल्या होत्या आणि रेल्वे रुळ बंद आहेत. पुरात लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत 'व्हॅलेन्सिया'चा पूलही कोसळला. व्हॅलेन्सियाच्या काही भागांत आठ तासांत वर्षभरात जितका पाऊस व्हायला हवा होता, तितका पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी शहरांमध्ये झालेल्या नुकसानीनंतर सांगितले की, पावसामुळे झालेल्या नुकसानमध्ये खराब झालेल्या सर्व इमारती आणि पूल पुन्हा बांधतील. तसेच शहर नव्याने उभे करण्यास मदत करतील.
स्पेनमधून अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, जे पाहून तेथील परिस्थिती किती बिघडली आहे हे स्पष्टपणे समजू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरामुळे माद्रिद आणि बार्सिलोना शहरांना जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात शाळा आणि इतर अत्यावश्यक सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. पुरामुळे व्हॅलेन्सियामध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
देशातील परिस्थिती बिघडल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. पोलिस आणि बचाव सेवांनी लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. तसेच कारच्या छतावर अडकलेल्या चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी बोटींचा वापर केला. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या आपत्तीबाबत सांगितले की, डझनभर शहरे पुरात बुडाली आहेत. धोका अजून संपलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान म्हणाले, जे लोक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत त्यांच्या वेदना संपूर्ण स्पेनला जाणवत आहेत. यावेळी आमचे प्राधान्य तुम्हाला मदत करणे आहे. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक संसाधने वापरत आहोत.