

पूर्णा : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान झालेल्या वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊन कापून टाकलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत असून १९ रोजी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पाऊस झाला होता. या परतीच्या पावसामुळे शेतात कापून टाकलेल्या काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन कडप्या पाण्याखाली जावुन त्यांची नुकसान झाले.
वेचणीला आलेला कापूस देखील झोडपला गेल्याने त्याच्या वाती झाल्या. परतीचा हा पाऊस सोयाबीन व कापसासाठी हाणीकारक ठरत आहे. तर हळद व ऊसासाठी वरदान ठरत आहे. मात्र या पावसामुळे रब्बी हंगामाला मोठी मदत होणार आहे, असेही शेतकरी बोलुन दाखवत आहेत. मात्र सोयाबीन कापणी करून ते जमा करण्याचे काम सुरू असताना या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. या दोन्ही पीकांचे काढणी पश्चातचे विमादावे मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.