Sri Lanka Helicopter Crash
श्रीलंकेत शुक्रवारी एक लष्करी हेलिकॉप्टर जलाशयात कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून १२ जण प्रवास करत होते. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ६ जण वाचले आहेत, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. मृतांमध्ये चार कमांडो आणि हवाई दलातील दोघा जवानांचा समावेश आहे.
हे हेलिकॉप्टर कोलंबोपासून सुमारे २८० किलोमीटर ईशान्येला असलेल्या मडुरू ओया येथील एका जलाशयात कोसळले. हवाई दलाचे प्रवक्ते एरांडा गीगानेज यांनी सांगितले की, हे हेलिकॉप्टर दोन पायलटसह १२ जणांना घेऊन प्रवास कर होते. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला. इतर सहाजण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीलंका हवाई दलाच्या पासिंग-आउट समारंभाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या प्रात्यक्षिकादरम्यान ही दुर्घटना घडली.
हवाई दलाच्या पासिंग आउट परेडच्या प्रात्यक्षिकादरम्यान क्रमांक ७ स्क्वॉड्रनचे बेल २१२ हेलिकॉप्टर मडुरू ओया जलाशयात कोसळले. या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी नऊ सदस्यांची एक विशेष समिती नियुक्त केली आहे. या घटनेत सहा कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, असे श्रीलंकेच्या हवाई दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
श्रीलंकेतील ही जानेवारी २०२० नंतरची हवाई दलाच्या बाबतीत घडलेली सर्वात प्राणघातक घटना आहे, २०२० मध्ये कोलंबोपासून सुमारे २०० किलोमीटर पूर्वेला हापुतले येथे चिनी बनावटीचे Y-१२ विमान कोसळले होते. त्यात सर्व चार क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता. श्रीलंकेत सप्टेंबर २००० मध्ये याहून मोठी दुर्घटना घडली होती. मध्य श्रीलंकेत Mi-१७ हेलिकॉप्टर कोसळून सर्व १५ जणांचा मृत्यू झाला होता.