Shubhanshu Shukla Axiom-4
फ्लोरिडा (यूएस) : "भारत ४१ वर्षांनंतर अवकाशात परतत आहे आणि हा एक अद्भुत प्रवास आहे. हा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात असल्याने सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुलली पाहिजे. जय हिंद! जय भारत!" अशा शब्दात अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळयानातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी फ्लोरिडातून अवकाशात झेपावलेल्या Axiom-4 मोहिमेचे शुभांशू पायलट आहेत.
अॅक्सिओम-४ (अॅक्स-४) मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर भारतीय आनंद साजरा करत आहेत. या मोहिमेचे पायलट असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय बनले आहेत. अवघ्या २६ तासांत जेव्हा हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) उतरेल तेव्हा ग्रुप कॅप्टन शुक्ला हे नासाच्या कक्षेत असलेल्या प्रयोगशाळेला भेट देणारे पहिले भारतीय बनतील. त्यांचा हा प्रवास १९८४ मध्ये रशियन सोयुझ यानातून अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या ४१ वर्षांनंतर झाला आहे.
ड्रॅगन अंतराळयानातून बोलताना शुभांशू शुक्ला म्हणाले, "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो, काय अद्भुत प्रवास आहे. आम्ही ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा अवकाशात आलो आहोत. हा एक विलक्षण प्रवास आहे. आम्ही पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर असलेला तिरंगा मला सांगतो की मी तुम्हा सर्वांसोबत आहे. माझा हा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) नसून भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे, अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. चला एकत्र मिळून भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात करूया. जय हिंद! जय भारत!"
ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील चौथी खासगी अंतराळवीर मोहीम आहे. अंतराळवीर एका नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून स्थानकाकडे प्रवास करत आहेत. गुरुवारी, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता ते पोहचतील. त्यानंतर अंतराळवीर १४ दिवसांपर्यंत प्रयोगशाळेत राहणार आहेत. नासाच्या माजी अंतराळवीर आणि Axiom Space च्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन या मोहिमेच्या कमांडर आहेत, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पायलट म्हणून कार्यरत आहेत. या मोहिमेतील दोन विशेषज्ञ पोलंडचे युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रकल्प अंतराळवीर स्लावोस्झ उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू आहेत.