

Sheikh Hasina Verdict:
भारताचा शेजारी देश बांगलादेशमध्ये आजचा दिवस खूप तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरूद्ध ICT बाबतचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगने आज देशभरात बंदची हाक दिली आहे.
आवामी लीगवर युनूस सरकारनं बंदी घातली आहे. त्यामुळं शेख हसीना यांच्याविरूद्धच्या निर्णयापूर्वी बांगलादेशमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाही तर जे हिंसाचार करण्याची शक्यता आहे त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळं देशातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
भारतात राजकीय आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक भावनिक संदेश दिला आहे. हा संदेश ऑडियो क्लिपच्या माध्यमातून देण्यात आला. त्यात त्यांनी बांगलादेशात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आणि आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी ढाका शहरात काही ठिकाणी बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे एक सल्लागार सैयदा रिजवाना हसन यांच्या घरासमोर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट झाले. अजून एक स्फोट हा कारवां बाजार भागात झाल्याची माहिती आहे. या स्फोटात कुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस (DMP) आयुक्त शेख मोहम्मद सज्जाद अली यांनी पोलीस अधिकाऱ्यांना जे कोणी हिंसा करतील आणि पोलिसांवर हल्ला करतील त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी शेख हसीना यांच्याबाबतचा निर्णय येण्यापूर्वी ढाका येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
शेख हसीना यांच्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मावनी हक्कांची पायमल्ली करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी गृहमंत्री असदुज्जामान खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल - मामुन यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी २३ ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण झाली होती. आज त्यावर निकाल येणार आहे.
रविवारी सकाळी बांगलादेशमध्ये नीरव शांतता होती. रस्त्यांवर लोकांची वर्दळ आश्चर्यकारकरित्या कमी होती. दुकाने उशीरा उघडली. अनेक लोकांनी घरी राहणंच पसंत केलं. ज्यावेळी आवामी लीगनं दोन दिवसांचा राष्ट्रव्यापी बंद पुकारला त्यावेळी चिंता वाढली.
अंतरिम सरकारनं आवामी लीग आणि त्यांच्या मित्रपक्षांवर बंदी घातली आहे. मात्र आवामी लीगचे नेते अज्ञात स्थळांवरून सोशल मीडियावरून पोस्ट करत लोकांना आवाहन करत आहेत.