

Sheikh Hasina
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने आधीच त्यांच्या 'अवामी लीग' पक्षावर निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे. आता फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे शेख हसीना यांचे बांगलादेशच्या राजकारणात परत येण्याचे मार्ग कायमचे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या अशांतता आणि मानवतेविरुद्धच्या ५ गंभीर गुन्ह्यांसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने म्हटले की, पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, शेख हसीना यांनी आंदोलकांना भडकावले, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले आणि हत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. आंदोलनाला क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
न्यायालयाने शेख हसीना यांना १४०० हून अधिक लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवले आहे. त्यांनी ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंना फोन करून हत्या करण्याची धमकी दिल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या सुनावणीनंतर हा निकाल आला आहे.
शेख हसीना यांच्यासोबतच माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना दोनपैकी एका प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल-मामून यांनी सरकारी साक्षीदार बनून सर्व सत्य न्यायालयासमोर उघड केल्यामुळे एका प्रकरणात त्यांना माफी देण्यात आली आहे. शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध ८७४७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यात पीडितांचे जबाब आणि जप्त केलेल्या पुराव्यांचा समावेश आहे. याच पुराव्यांच्या आधारे आयसीटीने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या (ICT) निकालापूर्वी, हसिना यांनी दावा केला होता की हे न्यायालय त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धकांच्या नियंत्रणाखाली आहे, जे अवामी लीगची प्रतिमा खराब करण्याचा आणि स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.