

Sharenting
नवी दिल्ली : सोशल मीडियावर मुलांचे शाळेच्या गणवेशातील फोटो पोस्ट करणे त्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा युनिव्हर्सिटी ऑफ साऊथॅम्पटनच्या संशोधकांनी दिला आहे. यामुळे मुलांची ओळख, पत्ता, जन्मतारीख आणि शाळेसारखी खासगी माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याचा धोका आहे. हा धोका केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर जगभरातील सर्व मुलांसाठी आहे.
संशोधनानुसार, सोशल मीडियावर मुलांचे फोटो पोस्ट करण्याला ‘शेअरेंटिंग’ म्हटले जाते. यामुळे मुलांची एक डिजिटल प्रोफाइल तयार होते, ज्यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, छंद आणि शाळा यांसारख्या वैयक्तिक माहितीचा समावेश असतो. ही माहिती सायबर गुन्हेगारांसाठी एक सोपे लक्ष्य बनते.
या फोटोंमुळे पुढील धोके निर्माण होऊ शकतात –
सायबरबुलिंग
ऑनलाईन छळ
ओळख चोरी
प्रायव्हसीचे उल्लंघन
अनोळखी लोकांशी संपर्क
शाळेच्या गणवेशामुळे शाळेचे नाव आणि घराबाहेर काढलेल्या फोटोमुळे पत्ता व गल्लीची ओळख होऊ शकते. ही माहिती ओळख चोरीसाठी वापरली जाऊ शकते. फोटोचा गैरवापर करून सायबरबुलिंग किंवा ऑनलाइन छळ केला जाऊ शकतो. डिजिटल प्रोफाइलमुळे अनोळखी व्यक्ती मुलांना सहजपणे संपर्क साधू शकतात.
या संशोधनात १००० हून अधिक ब्रिटिश पालकांशी संवाद साधण्यात आला. त्यापैकी ४५ टक्के पालकांनी मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे मान्य केले. धक्कादायक बाब म्हणजे, १६ टक्के पालकांच्या मुलांना सायबर गुन्हे किंवा ओळख चोरीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.
नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (NSPCC) च्या मते, AI च्या मदतीने मुलांच्या फोटोंमध्ये बदल करून ते डार्क वेबवर टाकले जाऊ शकतात, ज्यामुळे ते अत्यंत धोकादायक कामांसाठी वापरले जातील.
तज्ज्ञांच्या मते, फोटो पोस्ट करण्यापूर्वी पालकांनी विचार करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रायव्हसी सेटिंग्स आणि लोकेशन सेटिंग्स बंद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणीही तुमच्या घराचा पत्ता शोधू शकणार नाही. तसेच, खासगी अकाउंट्सही पूर्णपणे सुरक्षित नसतात, कारण टॅग केलेल्या पोस्ट मित्रांकडून शेअर होऊ शकतात. मुलांची सुरक्षा जपण्यासाठी ही खबरदारी घेणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.