

Samsung TV service down
सॅमसंग टीव्हीची सेवा डाउन झाली आहे. जगभरातील यूजर्सनी ही सेवा ठप्प झाल्याची तक्रार केली आहे. २ हजारहून अधिक यूजर्संनी डाउनडिटेक्टरवर याबाबत समस्या नोंदवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील यूजर्सनी ही समस्या निदर्शनास आणून देत तक्रारी केल्या आहेत.
जगभरातील सॅमसंग टीव्ही यूजर्सनी मोठ्या प्रमाणात सेवा बंद पडल्याची तक्रार केली आहे. डाउनडिटेक्टरच्या माहितीनुसार, यूजर्सना ॲप्स लोड करताना अडचण जाणवली. तसेच सर्व्हर एरर दिसून आला. ही समस्या सॅमसंग स्मार्ट हब सर्व्हरमधील व्यत्ययामुळे उद्भवली असल्याचे दिसते, जे त्याच्या टीव्हीवर ॲप कनेक्टिव्हिटी आणि अकाउंट सेवांना समर्थन देते.
डाउनडिटेक्टरवर नोंद झालेल्या तक्रारीनुसार, ७८ टक्के यजर्सना सॅमसंग टीव्हीवरील ॲप्समध्ये समस्या जाणवली. तर १३ टक्के यूजर्सना लॉगिन करताना एरर दिसून आला. तर ८ टक्के यूजर्सना वेबसाइटवर डाउन समस्या आली. सॅमसंगच्या अधिकृत कम्युनिटी फोरमवरील यूजर्सच्या पोस्टनुसार, गुरुवारी सायंकाळपासून आउटेज सुरू झाले. यूजर्सचे म्हणणे आहे की ते नेटफ्लिक्स, हुलू आणि YouTube सारख्या स्ट्रीमिंग ॲप्समध्ये प्रवेश करू शकत नाहीत. काहींना Server Certificate Error असे मेसेज मिळाले. हे आउटेज केवळ अमेरिकेत नाही तर अर्जेंटिना, युरोप आणि भारतातील यूजर्सनाही जाणवले.
अद्याप, सॅमसंगकडून आउटेजची पुष्टी करणारे अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेली नाही.