

Salesforce Marc Benioff AI
कॅलिफोर्निया: सेल्सफोर्स कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात एक विरोधाभास दाखवणारे विधान केले आहे. एका बाजूला त्यांच्या कंपनीने ४ हजार ग्राहक सहाय्यक (Customer Support) कर्मचाऱ्यांची कपात करून त्या जागी एआय एजंट्सचा वापर सुरू केला आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी विक्रीसाठी मात्र माणसाची गरज असल्याचे म्हटले आहे.
'टीबीपीएन' नावाच्या YouTube कार्यक्रमात बोलताना बेनिऑफ यांनी धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, "एआयला आत्मा नाही आणि माणसासारखा संवाद साधू शकत नाही. एआयमध्ये विक्री भूमिकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीची कमतरता आहे." त्यांच्या मते, विक्री क्षेत्रात मानवी संवादाचे महत्त्व अजूनही अबाधित आहे.
सेल्सफोर्सने इतक्या मोठ्या प्रमाणात एआयचा वापर सुरू केल्यानंतरही, बेनिऑफ यांनी आता ३,००० ते ५,००० नवीन सेल्सपर्सनची भरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे उद्दिष्ट या वर्षात २०,००० अकाऊंट एक्झिक्युटिव्ह्सपर्यंत पोहोचण्याचे आहे.
बेनिऑफ यांची भरतीची घोषणा आणि काही महिन्यांपूर्वीच कपातीचा निर्णयामुळे विरोधाभास निर्माण झाला आहे. सप्टेंबरमध्ये 'द लोगन बार्टलेट शो' पॉडकास्टवर त्यांनी सांगितले होते की, कंपनीने ग्राहक समर्थन कर्मचाऱ्यांची संख्या ९,००० वरून ५,००० पर्यंत कमी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले होते की, "मला कमी कर्मचाऱ्यांची गरज आहे," कारण आता ५० टक्के ग्राहक संवाद एआय एजंट्सद्वारे हाताळले जातात. या कपातीमुळे कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ च्या सुरुवातीपासून खर्चात १७ टक्के कपात झाली. कंपनीच्या AI एजंट्सनी आतापर्यंत १० लाखांहून अधिक ग्राहक संवाद पूर्ण केले आहेत, ज्यामुळे हे सिद्ध झाले की, AI विशिष्ट क्षेत्रांत मानवी कामाची जागा घेऊ शकते.
बेनिओफ यांच्या म्हणण्यानुसार, एआय नियमित आणि पुनरावृत्ती होणारी ग्राहक समर्थन कार्ये प्रभावीपणे हाताळू शकते, परंतु गुंतागुंतीचे आणि विश्वासावर आधारित असलेले विक्री संबंधीत कामे अजूनही मानवी कौशल्याशिवाय शक्य नाहीत.