

Russia Ukraine war
ईशान्य युक्रेनच्या सुमी प्रदेशात एका बसवर झालेल्या रशियाच्या ड्रोन हल्ल्यात ९ प्रवासी ठार झाले. तर सात जण जखमी झाले, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये शांततेसाठी थेट चर्चा झाल्यानंतर दुसरीकडे काही तासांतच हा हल्ला झाला.
टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर शेअर केलेल्या एका निवेदनात सुमी प्रादेशिक प्रशासनाने म्हटले आहे की, "हा रशियाने केलेला आणखी एक युद्ध गुन्हा आहे. प्रवासी वाहतुकीवर जाणूनबुजून केलेला हा हल्ला होता. ज्यामुळे कोणताही धोका नव्हता.''
दोन्ही देशांच्या नेत्यांनी संभाव्य द्विपक्षीय बैठक, युद्धविराम आणि कैद्यांच्या अदलाबदलीवर चर्चा केली. ही चर्चा निष्फळ ठरली. यानंतर काही तासांतच रशियाकडून हवाई हल्ला झाला.
सुमी प्रदेशातील बिलोपिलिया शहरात शनिवारी सकाळी ड्रोन हल्ल्याची घटना घडली, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमी लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह ह्रिहोरोव्ह यांनी याबाबत सांगितले की, बसवरील हल्ल्यात ७ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
"हा केवळ हल्ला नाही. तर हा एक निंदनीय स्वरुपाचा युद्ध गुन्हा आहे," असे युक्रेन राष्ट्रीय पोलिसांनी टेलिग्रामवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियाने नागरिकांना लक्ष्य केल आहे, असे पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रशियाने हा हल्ला केला असल्याच्या युक्रेनच्या दाव्यावर रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, रशियाची अधिकृत सरकारी वृत्तसंस्था TASS ने याचदरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत वृत्त दिले की, रशियाच्या सैन्याने सुमी प्रदेशातील युक्रेनच्या उपकरण साठवणुकीच्या ठिकाणी ड्रोनने हल्ला केला.
युक्रेन पोलिसांनी शेअर केलेल्या एका छायाचित्रात प्रवाशी बसचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते.
युक्रेनमध्ये गेल्या २४ तासांत रशियाच्या हल्ल्यांमध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ३८ जण जखमी झाले आहेत. डोनेस्तक प्रदेशातील हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. खार्किव्ह आणि खेरसन येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
रशियाने शनिवारी सांगितले की वोलोदिमिर झेलेन्स्की आणि व्लादिमिर पुतिन यांच्यात बैठक होऊ शकते. पण काही अटी पूर्ण झाल्यानंतर हे शक्य आहे. दरम्यान, शुक्रवारी दोन्ही बाजूंकडील अधिकाऱ्यांमध्ये पहिलीच समोरासमोर बैठक झाली. पण बैठक निष्फळ ठरली.