
Russia-Ukraine peace talks :मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर २४ तासांमध्येच रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध संपवेन, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी छातीठोकपणे दिले होते. मात्र राष्ट्राध्यक्षपदावरुन येवून पाच महिन्यांनंतरही त्यांना दोन्ही देशांमधील संघर्षाला पूर्णविराम देणे शक्य झाले नाही. आता त्यांनी याविषयावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तब्बल दोन तास फोनवरुन चर्चा केली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दोन्ही देश युद्ध संपवण्यासाठी त्वरित चर्चा सुरू करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच शांततेचे नवे पर्व सुरु होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दोन्ही देश युद्ध संपवण्यासाठी त्वरित चर्चा सुरू करतील. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत. पोप यांच्या प्रतिनिधीत्वाखालील व्हॅटिकनने शांतता चर्चेचे आयोजन करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, रशियन माध्यमांनुसार, पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा दोन तासांपेक्षा जास्त काळ चालली. रशियन राष्ट्राध्यक्षांनी ही चर्चा महत्त्वाची, स्पष्ट आणि उपयुक्त असल्याचे वर्णन केले. रशिया आणि युक्रेनमधील थेट चर्चा पुन्हा सुरू करण्यात अमेरिकेच्या भूमिकेबद्दल त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.
ट्रम्प यांच्याशी दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या संभाषणात पुतिन यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही युद्ध थांबवण्याचे समर्थन करतो. शांततेसाठी सर्वात प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. रशिया शांततापूर्ण तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही बाजूंना अनुकूल तडजोड करावी लागेल. दोन्ही देशांमधील करारानंतर युद्धबंदी शक्य आहे. त्यांनी चर्चेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.
पुतिन यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती. तसच ते नाटो सदस्य देशांशीही चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, युक्रेन आणि सहयोगी देश युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचा विचार करत आहेत.ही बैठक तुर्की, व्हॅटिकन किंवा स्वित्झर्लंड आयोजित करण्यात येवू शकते. यासंदर्भात सोमवारी (दि.१९ मे) ट्रम्प यांच्याशी दोनदा संभाषण झाले आहे. तसेच यानंतर न्स, फिनलंड, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबतही चर्चा झाली आहे.
रशियाला शांतता करारासाठी राजी करण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक ऑफर दिल्या आहेत. यामध्ये निर्बंध शिथिल करणे, नवीन व्यापार करार आणि आर्थिक गुंतवणूक यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शांतता करार वास्तवात येईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.