पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणात लादलेल्या आयात शुल्क (टॅरिफ) वाढीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसत आहे. बाजारपेठेत मोठी घसरण होत असताना ट्रम्प यांनी टॅरिफ मागे घेणार नाही. यापुढे अमेरिका व्यापार तूट सहन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
अधिकृत विमान एअर फोर्स वनमधून माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, " जगभरातील शेअर बाजार कोसळू नयेत असे आम्हाला वाटते. आम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये घसरण घडवून आणायची नाही. मात्र कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी वेदनादायक औषध घ्यावे लागते". ट्रम्प यांनी आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि देशातही त्यांचे निषेध सुरू झाले आहेत हे उल्लेखनीय आहे. तथापि, ट्रम्प यांनी त्यांच्या निर्णयापासून मागे हटण्यास नकार दिला आहे.
'मी युरोप, आशिया आणि जगभरातील अनेक नेत्यांशी बोललो आहे. त्यांना आमच्याशी करार करायचा आहे; पण आम्ही आता व्यापार तूट सहन करणार नाही आणि आम्ही त्यांना हे स्पष्टपणे सांगितल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट म्हणाले की, अन्याय्य पद्धतीने व्यवसाय करणे योग्य नाही. वेगवेगळे देश आम्हाला काय ऑफर देतात ते आम्ही पाहू.त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. मंदी येणार नाही. बाजार एक-दोन दिवसांसाठी या शुल्कावर प्रतिक्रिया देईल, परंतु आमचा प्रयत्न दीर्घकालीन आर्थिक संबंध निर्माण करण्याचा आहे. ट्रम्प यांना टॅरिफच्या मुद्द्यावरील विरोधाचीही जाणीव आहे. रविवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आपण जिंकू, पण तोपर्यंत तुमचे धाडस ठेवा.' हे अजिबात सोपे नसेल. ट्रम्प यांनी त्यांच्या कॅबिनेट अधिकाऱ्यांना सरकारच्या शुल्क लादण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्याचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होईल असे दावे नाकारण्याचे निर्देश दिले आहेत.
रविवारी उशिरा अमेरिकेतील स्टॉक फ्युचर्समध्ये तीव्र घसरण झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेचा पुन्नरुच्चार केला. जागतिक व्यापारी भागीदारांनी अपेक्षेपेक्षा जास्त कठोर टॅरिफवर प्रतिक्रिया दिल्याने गुंतवणूकदारांना आणखी एका आठवड्यात अशांततेची अपेक्षा होती. एस अँड पी ५०० ई-मिनिस स्टॉक फ्युचर्स गेल्या आठवड्यात ४ टक्क्यांनी घसरले होते. डाऊ ई-मिनिस ३.८ टक्क्यांनी घसरले होते, तर नॅस्डॅक १०० ई-मिनिस रविवारी उघडताना ४.६ टक्क्यांनी घसरले होते.
सोमवारी आशियाई बाजारपेठांमध्ये वाईट सुरुवात झाली कारण वॉल स्ट्रीट फ्युचर्स घसरले. अमेरिकेत मंदीचा धोका वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेत दर कपात होऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जावू लागला आहे. "बाजारपेठेचे काय होणार आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण, आपला देश खूप मजबूत आहे," असे ट्रम्प यांनी महटले आहे.
ट्रम्प म्हणाले की, चीनसोबतची व्यापार तूट दूर होईपर्यंत ते बीजिंगशी करार करणार नाहीत. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सर्व चिनी आयातीवरील विद्यमान २० टक्के शुल्काव्यतिरिक्त चीनवर अतिरिक्त ३४ टक्के परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली. चीनने सर्व अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के शुल्क लादण्याची घोषणा करून प्रत्युत्तर दिले.