Russia strikes Ukraine Cabinet Building :
काही आठवड्यापूर्वी अमेरिका आणि रशिया यांच्यात अलास्का इथं युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नसल्याचे संकेत आज मिळाले. रशियानं युक्रेनवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. यावेळी रशियानं युक्रेनची राजधानी विशेष म्हणजे कॅबिनेट बिल्डिंग टार्गेट केली. यात जवळपास ४ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास १२ लोकं जखमी झाली आहेत. याबाबतची माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिली आहे. या हल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमधील सरकारी इमारतीतून आग अन् धुराचे लोट बाहेर येत होते.
राज्य आपत्कालीन सेवा विभागानं सांगितलं की रशियाच्या हल्ल्यात कीवमधील काही उंच इमारतींचं नुकसान झालं आहे. याबाबतचे फोटो प्रशासनानं टेलिग्रामवर पोस्ट केले आहेत. यात अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत.
युक्रेनची कॅबिनेट मिनिस्टर बल्डिंग ही कीवमध्ये आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये या बिल्डिंगचं मोठं नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान युलिआ स्वरयदेन्को यांनी सांगितलं. ते म्हणाले, 'बिल्डिंगच्या वरच्या मजल्याचं छत या हल्ल्यात डॅमेज झालं आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
एएफपीच्या रिपोर्टनुसार कॅबिनेट मिनिस्टर बल्डिंगमधून धूर येत होता. या बिल्डिंगच्या वर हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. या हेलिकॉप्टरमधून बिल्डिंगवर पाणी टाकण्यात येत होतं. या हल्ल्यानंतर युक्रेन प्रशासनानं संपूर्ण देशात एअर अलर्ट जारी केली आहे.
फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या नेतृत्वाखाली १२ देशांनी गुरूवारी युद्ध स्थगित करण्यासाठी युक्रेनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव वेस्टर्न फोर्स तैनात करण्याची मागणी केली होती. युक्रेननं देखील सुरक्षेच्या हमीसाठी या वेस्टर्न फोर्सच्या तैनातीला पाठिंबा दर्शवला होता. जर शांतता प्रस्थापित करायची असेल आणि रशियाने भविष्यात कोणताही हल्ला करू नये यासाठी देशात वेस्टर्न फोर्स तैनात करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.
मात्र पश्चिमी देशांची ही मागणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळून लावली. त्यांनी युक्रेनमध्ये कोणतीही वेस्टर्न फोर्स अमान्य असल्याचं सांगितलं. रशियाच्या आणि पश्चिमी देशांच्या या भूमिकेमुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यापूर्वी युद्ध थांबवण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. त्यामुळे तुर्तास तरी रशिया युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळं याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर देखील पडण्याची शक्यता आहे.
रशियानं युक्रेनचा जवळपास २० टक्के भाग काबीज केला आहे. गेल्या साडेतीन वर्षे सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हा सर्वात रक्तरंजीत संघर्ष ठरला आहे.