

Coldplay Kiss Cam scandal Kristin Cabot divorce
नवी दिल्ली : अमेरिकेतील मोठी टेक कंपनी Astronomer च्या माजी एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांनी कंपनीचे तत्कालीन CEO अँडी बायरन यांच्यासोबत रोमान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिन्याभरातच पती अँड्र्यू कॅबोट यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. बॉस्टनमध्ये जुलै महिन्यात मॅसॅच्युसेट्समधील जिलेट स्टेडियममध्ये झालेल्या कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये 'किस कॅम'वरील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
१३ ऑगस्ट रोजी न्यू हॅम्पशायरच्या पोर्ट्समाउथ येथील न्यायालयात क्रिस्टिन यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. क्रिस्टिन या जुलै महिन्यात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. Coldplay च्या कॉन्सर्टदरम्यान स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर आपल्या बॉससोबत म्हणजेच कंपनीचे तत्कालीन CEO अँडी बायरन यांच्या सोबत दिसल्या होत्या. दोघे रोमान्स करताना कॅमेऱ्यात दिसले होते. हे लक्षात आल्यावर त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला आणि अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. क्रिस्टिन यांचा पती अँड्र्यू कॅबॉट हे Privateer Rum कंपनीचे CEO असून बॉस्टनमधील “ब्राह्मिन” कुटुंबातील वंशज असल्याचे समोर आले होते.
अँड्र्यू कॅबॉटचा हा तिसरा घटस्फोट आहे. अँड्र्यू कॅबॉटची पहिली पत्नी जुलिया हिला हा घटस्फोट धक्कादायक वाटला नाही. अँड्र्यू आणि जुलिया यांचे लग्न २०१४ मध्ये झाले होते. २०१८ मध्ये ते वेगळे झाले. किस कॅम व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जुलियाने अँड्र्यूला मेसेज केला होता. त्यावेळी त्याने “क्रिस्टिनचा आणि माझा काही संबंध नाही, आधीपासूनच आम्ही वेगळे होण्याची तयारी करत होतो," असे सांगितले. जुलियाने मात्र अँड्र्यूवर टीका केली आहे. “त्याच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा आहे, पतीच्या लायकीचा नाहीच पण, क्रिस्टिनही पत्नीच्या लायकीची नाही,” असे म्हटले आहे. जुलियाच्या म्हणण्यानुसार, अँड्र्यूला या वादाचा फारसा धक्का बसला नाही, पण लोकांच्या नजरेत तो नक्कीच लाजिरवाणा झाला.
क्रिस्टिन आणि अँड्र्यू २०२३ पासून न्यू हॅम्पशायरमधील राय येथे एकत्र राहत होते. यावर्षी फेब्रुवारीत त्यांनी मिळून २.२ लाख डॉलर्स किंमतीचे घर खरेदी केले होते. क्रिस्टिन (वय ५२)चा हा दुसरा घटस्फोट ठरेल. याआधी तिने केनेथ थॉर्नबीपासून २०२२ मध्ये घटस्फोट घेतला होता.