

Russia Ukraine war
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने शुक्रवारी रात्री युक्रेनवर ४०० हून अधिक ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रे डागली. यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला. तर ८० लोक जखमी झाले आहेत. रशिया- युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यानचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याने जवळपास संपूर्ण युक्रेनला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे कीव, ल्विव्ह आणि सुमी यासह नऊ प्रदेश प्रभावित झाले आहेत.
या हल्ल्याचे फुटेज समोर आले असून त्यात जमिनीवर क्षेपणास्त्रे कोसळताना दिसून आली आहेत. युक्रेनने रशियातील हवाई क्षेत्रावर ड्रोन हल्ला केला होता. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या हल्ल्याला रशिया प्रत्युत्तर देऊ शकते, असे म्हटले होते. यानंतर काही तासांतच युक्रेनवर विनाशकारी हल्ला केला.
युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनात यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला अनेक तास चालू राहिला. ४०७ ड्रोन आणि ४४ बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने युक्रेनमधील ६ प्रदेशांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, युक्रेनने हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या संरक्षण दलांनी सुमारे ३० क्षेपणास्त्रे आणि २०० ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात कीवमधील आपत्कालीन सेवा देणारी ३ कर्मचारी आणि लुत्स्क, चेर्निहिव्हमधील नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी होण्याची शक्यता आणखी धूसर बनली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, X वर पोस्ट करत रशियाच्या या हल्ल्याचा निषेध नोंदवला. झेलेन्स्की यांनी, हा हल्ला युद्ध सुरू झाल्यापासूनच्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. "या देशाला शांतता नको आहे. रशिया आपला दृष्टिकोन बदलत नाही." असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
"रशियाने ४०० हून अधिक ड्रोन, ४० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यात ८० लोक जखमी झाले. अजून काहीजण ढिगाऱ्याखाली असू शकतात," असे त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवा विभागाच्या माहितीनुसार, कीव्हमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान, लुत्स्कमध्ये दोन नागरिक आणि चेर्निहिव्हमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. याआधी रविवारी रात्री केलेल्या हल्ल्यात रशियाने युक्रेनवर ४७२ ड्रोन आणि सात क्षेपणास्त्रे डागली होती.