

China Earthquake Love Story: चीनमध्ये घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सध्या जगभर चर्चेत आहे. 15 वर्षांपूर्वी भूकंपातून ज्याने एका 11 वर्षांच्या चिमुकलीला वाचवलं, त्याच जवानाशी त्या मुलीने आता लग्न केलं आहे. ही अनोखी प्रेमकहाणी हुन्नान प्रांतातील चांगशा शहरात 5व्या हॅन-स्टाईल सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान समोर आली. या सोहळ्यात 37 जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.
2008मध्ये चीनमधील वेंचुआन येथे भीषण भूकंप झाला. त्या वेळी 22 वर्षीय जवान लियांग झिबिन बचाव कार्यात तैनात होते. 11 वर्षांची लियू झीमेई एका उद्ध्वस्त इमारतीच्या दुसऱ्या मजल्याखाली पूर्णपणे दगड-लोखंडी सळ्यांखाली अडकली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लियांग आणि त्यांच्या टीमने तिला जिवंत बाहेर काढले. उपचारानंतर लियू आणि तिचं कुटुंब हुन्नानमधील झुझोऊ येथे परतले. “मला वर्षानुवर्षे त्यांचा चेहरा आठवत नव्हता, एक धूसर चेहराच मनात होता,” असं लियूने सांगितलं.
12 वर्षांनंतर, 22 वर्षांची लियू पालकांसोबत चांगशातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होती.
तेव्हाच तिच्या आईने शेजारच्या टेबलाकडे बघत म्हटलं, “तो जवान नाही का ज्याने तुला वाचवलं होतं?” लियू घाबरत घाबरत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, “ब्रदर लियांग? तुम्हीच का?” ते दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते, लियांग म्हणाला, “ती इतकी बदलली होती की मी तिला ओळखूच शकलो नाही.” त्या दिवशीच लियूने त्यांचा फोन नंबर घेतला.
त्यांच्या संवादातून हळूहळू लियूला जाणवलं की ती लियांगवर प्रेम करत आहे. लियांगची प्रामाणिकता, शांत स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन लियूला भावला.
लियू म्हणते, “कृतज्ञतेमुळे नाही तर सहवासाने जाणवलं की हा माणूस माझ्या आयुष्याचा आधार बनू शकतो.” लियांगही तिच्या प्रेमाने भारावला होता. “12 वर्षांपूर्वी तिला वाचवणं माझं कर्तव्य होतं. पण आज माझं तिच्यावर खरं प्रेम आहे.”
29 नोव्हेंबर 2025 रोजी, हॅन-स्टाईल विवाहसोहळ्यात हे जोडपे विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर लाखो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.