दुबई: हवाई प्रवासात सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि बॅटरीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी एमिरेट्स (Emirates) या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून एमिरेट्सच्या विमानांमध्ये प्रवाशांना पॉवर बँक (Power Bank) वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या नियमानुसार, प्रवासादरम्यान तुम्ही पॉवर बँक वापरून तुमचा मोबाईल, टॅब्लेट किंवा अन्य कोणतंही उपकरण चार्ज करू शकणार नाही. तसेच, विमानातील सीटजवळ असलेल्या आउटलेटमधून पॉवर बँक चार्ज करण्याची प्रवाशांना आता परवानगी देखील नसणार आहे.
एमिरेट्सने प्रवाशांना त्यांच्याकडील 'पॉवर बँक'बाबत खालील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत:
केवळ हॅन्ड बॅगमध्ये परवानगी: प्रत्येक प्रवासी त्यांच्यासोबत हॅन्ड बॅगमध्ये (Hand Luggage) एक पॉवर बँक घेऊन जाऊ शकतो.
क्षमता मर्यादा: पॉवर बँकेची क्षमता १०० वॅट-अवर (Wh) पेक्षा जास्त नसावी. (साधारणपणे २७,००० mAh पर्यंत).
प्रवासादरम्यान बंद ठेवावी लागेल: संपूर्ण प्रवासादरम्यान पॉवर बँक स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक आहे.
घरीच फूल चार्जिंग करा: प्रवाशांनी विमानामध्ये चढण्यापूर्वी आपले सर्व मोबाईल आणि टॅब्लेट पूर्ण चार्ज करून घ्यावेत, कारण विमानात इन-सीट चार्जिंग पोर्ट उपलब्ध असले तरी पॉवर बँक वापरता येणार नाही.
ठेवण्याची जागा: पॉवर बँक केवळ तुमच्या सीटच्या खिशात (Seat Pocket) किंवा पुढील सीटच्या खाली ठेवावी लागेल, तिला ओव्हरहेड बिन्समध्ये (Overhead Bins) ठेवण्याची परवानगी नाही.
विमान कंपनीच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत पॉवर बँकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांमध्ये लिथियम-आयर्न किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरी असतात. अनेकदा खराब किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास या बॅटरी जास्त गरम होतात आणि त्यातून आग लागण्याचा धोका असतो. या वाढत्या धोक्यामुळेच सुरक्षितता पुनरावलोकन (Safety Review) करून एमिरेट्सने हा कठोर निर्णय घेतला आहे. एमिरेट्सच्या विमानांमध्ये पूर्वीपासूनच चार्जिंग पोर्ट्सची सोय आहे, ज्यामुळे प्रवाशांना पॉवर बँक वापरण्याची गरज भासू नये, असे कंपनीने म्हटले आहे.
जगातील अनेक विमान वाहतूक संस्था, जसे की FAA, IATA, TSA, या पॉवर बँकच्या वापराचे नियमन करतात. या नियमांनुसार, पॉवर बँक नेहमी हॅन्ड बॅगमध्ये ठेवावी लागते आणि ती १०० Wh पेक्षा कमी क्षमतेची असावी लागते. मात्र, एमिरेट्सने आता या नियमांमध्ये आणखी कडक अंमलबजावणी करत, पॉवर बँक वापरण्यासच बंदी घातली आहे.
प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपली पॉवर बँक योग्य क्षमतेची आणि सुरक्षित असल्याची खात्री करावी. तसेच, विमानतळावर जाण्यापूर्वी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्ण चार्ज करून न्यावीत, अशा सूचना नियमित विमान प्रवास करणाऱ्या विमान कंपन्यांकडून करण्यात आल्या आहेत.