

मुंबई; वृत्तसंस्था : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या विमानांना तांत्रिक बिघाडांची समस्या सातत्याने भेडसावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एअर इंडियाने 17 ऑगस्ट रोजी झुरिचहून दिल्लीला येणारे विमान तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी रद्द केले. मात्र विमानात बसलेल्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर दावा केला आहे की, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाने टेक ऑफच्या शेवटच्या क्षणी उड्डाण थांबवले.
गेल्या काही दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी कोची-दिल्ली आणि मिलान-दिल्ली ही उड्डाणेदेखील तांत्रिक कारणांमुळे अचानक रद्द करावी लागली होती. कोची विमानतळावर टेक-ऑफ रद्द झालेल्या विमानात काँग्रेस खासदार हिबी इडन हेदेखील प्रवास करत होते. युरोपातील मार्गांवर एअर इंडिया प्रामुख्याने बोईंग 787 विमानांचा वापर करते आणि याच विमानांमध्ये वारंवार समस्या येत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी बोईंग 787 विमानांच्या ताफ्याची सखोल तपासणी केली असून त्यात कोणतीही समस्या आढळली नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही उड्डाणे रद्द होण्याचे सत्र सुरूच असल्याने कंपनीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, झुरिचमधील प्रवाशांसाठी पर्यायी विमानांची सोय, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि तिकीट परताव्याचे पर्याय उपलब्ध करून दिल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.