PoK Election Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचाराचा भडका; चकमकीत ३० नागरिकांचा मृत्यू

'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'ने उपस्‍थित केले पाकिस्‍तानी लष्‍कराच्‍या कारवाईवर सवाल
PoK election violence
PoK election violenceFile Photo
Published on
Updated on

PoK election violence : पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्‍यातील काश्मीरमध्ये (PoK) हिंसाचाराचा भडका उडाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात गेल्या ४८ तासांत किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानी सैन्यानेच ही हत्या केल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराच्या हिंसक कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून कडक शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत. युनायटेड किंगडममध्ये (UK) राहणाऱ्या काश्मिरी प्रवाशांनी याविरोधात निदर्शने केली आहेत, तर मानवाधिकार संघटना 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'ने या प्रदेशात अधिक स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पाकिस्तानी प्रशासनाकडून महिन्यांपासून सुरु असलेल्या दडपशाहीकडे जगाचे लक्ष वेधले आहे.

'जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी'चा गंभीर आरोप

'जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी'ने (JAAC) असा गंभीर आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने गेल्या दोन दिवसांत ३० हून अधिक नागरिकांची हत्या केली. यामध्ये सोमवारी २५ आणि मंगळवारी ५ जणांचा समावेश आहे. सोमवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा ठप्प, राजकीय अस्थिरता, लष्कराची सशस्त्र कारवाई आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झालेली बोगसरि यांसारख्या गंभीर आरोपांच्या सावटाखाली मतदान पार पडले.

ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची स्वतंत्र चौकशीची मागणी

'ॲम्नेस्टी साऊथ आशिया'च्या कार्यवाहक संचालक इसाबेल लॅसी यांनी निवेदनात म्‍हटलं आहे की, "या घटना म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शकांविरुद्ध पाकिस्तानकडून बऱ्याच काळापासून वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर हिंसाचाराच्या परंपरेचाच एक भाग आहेत. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर केलेल्या बळाच्या वापराची तातडीने, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजेत. जोपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल सेवांवरील बंदी कायम राहील, तोपर्यंत प्रत्यक्ष परिस्थितीची स्वतंत्र चौकशी करण्यात गंभीर अडचणी येतील. आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सर्व दळणवळण सेवा पूर्ववत करण्याचे आणि प्रसारमाध्यम तसेच स्वतंत्र निरीक्षकांना या भागात जाण्याची परवानगी देण्याचे आवाहन करतो."

५ जूनपासून इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प

पाकिस्तानी प्रशासनाने ५ जूनपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी कठोर कारवाईचा मार्ग निवडण्यात आला. अधिक स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या 'JAAC' च्या नेतृत्वाखालील आंदोलनावर गेल्या अनेक आठवड्यांपासून दडपशाही सुरु आहे. या हिंसक निदर्शनांमध्ये आतापर्यंत किमान ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यात ३४ निदर्शक आणि ६ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर अधिकाऱ्यांनी 'JAAC' वर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातली आहे.

PoK election violence
PoK Crisis Draws Global Attention | पाकची दमनशाही

आंदोलन का सुरु झाले?

'JAAC' चे हे आंदोलन सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेत जम्मू-काश्मीरमधील निर्वासितांसाठी राखीव असलेल्या १२ जागा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरु झाले होते. हळूहळू या आंदोलनाला मोठे स्वरूप आले. ते पाकिस्तानी राजवटीविरोधातील गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठे आंदोलन ठरले. या निदर्शनांमध्ये इस्लामाबादच्या या प्रदेशावरील नियंत्रणाला विरोध केला जात असून, पाकिस्तानी सैन्य या क्षेत्राला दहशतवादाकडे ढकलत असल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. ॲम्नेस्टीच्या लॅसी यांनी स्पष्ट केले की, 'JAAC' वरील बंदीमुळे निवडणुकीतील तणाव अधिक वाढला आहे.

JAAC च्या संस्थापकाचा भाऊ पाकिस्‍तानी लष्‍कराच्‍या कारवाईत ठार

'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'JAAC' च्या मुख्य टीमचे सदस्य इम्तियाज अस्लम यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याच्या या हिंसक कारवाईत आंदोलनाचे संस्थापक उमर नझीर काश्मीरी यांचा धाकटा भाऊ उस्मान नझीर मारला गेला आहे. मंगळवारी इंग्लंडमधील ब्रॅडफर्ड येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर 'JAAC' च्या समर्थकांनी पाकव्याप्त काश्मीरमधील 'पाकिस्तानच्या अत्याचारां'विरोधात तीव्र निदर्शने केली आणि नागरिकांच्या हत्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. 'JAAC' ने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पाकिस्तानी सैन्याने या भागात किमान ६७ निष्पाप नागरिकांना ठार केले आहे.

PoK election violence
PoK Protests : 'पाकिस्तानी सैन्याने चालते व्हावे'; पीओकेमधील आंदोलनाची शाळकरी मुलांनी सांभाळली धुरा

पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मोठा हिंसाचार

सोमवार, २७ जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मोठा हिंसाचार उसळला. 'द डॉन'च्या वृत्तानुसार, प्राथमिक निकालांमध्ये मीरपूर परिसरात 'पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज)' (PML-N) पक्षाने आघाडी घेतली असून 'पाकिस्तान पीपल्स पार्टी' (PPP) दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या 'पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ' (PTI) पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, तर 'JAAC'च्या सदस्यांना अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.'JAAC'चे प्रवक्ते एस. ए. खान यांनी पाकिस्तानी सैन्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, मंगळवारी मीरपूर येथे निशस्त्र आंदोलकांवर सैन्याने गोळीबार केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पळवून नेले. 'न्यू यॉर्क टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, खान म्हणाले, "सुरक्षा दलांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयांना टाळे ठोकले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे फोटो आणि व्हिडीओ पुरावे आमच्याकडे आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठीच सैन्याने हे मृतदेह पळवले."

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी माहिती दडपली

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या हत्यांच्या विरोधात मंगळवारी दुपारी नागरिक पुन्हा एकत्र आले आणि हिंसाचार अधिक भडकला. मात्र, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या हिंसाचारातील मृत किंवा जखमींची कोणतीही विस्तृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.दरम्यान, पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी या आंदोलनाला 'भारत पुरस्कृत' म्हटले आहे, तर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर आंदोलकांना 'भारतासारखे शत्रू' संबोधले आहे. 'JAAC'च्या सदस्यांनी या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news