

Banlgadeshi former PM Sheikh Hasina sentenced
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) न्यायालयाची अवहेलना केल्याप्रकरणी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा त्यांना त्यांच्या हद्दपारीनंतरची पहिलीच शिक्षा आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये शेख हसीना आणि बांगलादेश छात्र लीगशी संबंधित शकील आकंद बुलबुल यांच्यातील एक फोन कॉल लीक झाला होता. या कॉलमध्ये हसीना म्हणाल्या होत्या की, “227 केसेस माझ्यावर दाखल आहेत, त्यामुळे मला 227 लोकांना मारण्याचा परवाना मिळालाय.”
या विधानामुळे न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला. यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचे मानत त्रिसदस्यीय खंडपीठाने शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एम. डी. गोलाम मोर्तुजा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल देण्यात आला.
शकील आकंद बुलबुल यालाही याच प्रकरणात दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शेख हसीना यांना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेल्या प्रचंड आंदोलनांमुळे पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
‘Students Against Discrimination (SAD)’ या विद्यार्थ्यांच्या चळवळीने सुरू झालेल्या आंदोलनेनंतर देशभर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार तब्बल 1400 लोकांचा मृत्यू झाला होता.
हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी भारतात पलायन केले. त्यांच्या अनेक माजी मंत्र्यांवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही आता कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर, नोबेल पुरस्कार विजेते प्रो. मुहम्मद युनूस (वय 85) यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यांनी आता बांगलादेशात स्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
ही कारवाई शेख हसीना यांच्या राजकीय भविष्यावर मोठा परिणाम करू शकते. त्यांच्या अटकेनंतरच त्यांची शिक्षा अमलात येईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
शेख हसीना वाजेद (Sheikh Hasina) या बांगलादेशच्या सर्वात प्रभावशाली आणि दीर्घकाळ सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. त्या अवामी लीग (Awami League) या राजकीय पक्षाच्या प्रमुख (President) आहेत.
त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी तुंगीपारा, बांगलादेश येथे झाला. त्यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपिता होत.
हसिना यांचे शिक्षण ढाका विद्यापीठातून झाले आहे. त्यांचे पती दिवंगत डॉ. एम. ए. वाजेद मियां हे अणुशास्त्रज्ञ होते. शेख हसीना 1996 ते 2001आणि 2009 ते ऑगस्ट 2024 या काळात पंतप्रधान म्हणून सत्तेत होत्या. 2024 मध्ये मोठ्या आंदोलनांनंतर त्यांनी राजीनामा दिला व भारतात आश्रय घेतला.