

Philippines Earthquake :
फिलिपिन्समध्ये आज सकाळी (दि. १०) ७.६ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटाच्या दावाओ ओरिएंटल प्रांतातील मानय शहराजवळ समुद्रात १० किलोमीटर पाण्याखाली होता. त्यामुळे जमिनीवर जोरदार हादरे बसले. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून किनारी भागांतील लोकांना स्थलांतरीत होण्याचा सल्ला दिला आहे.
फिलीपिन्सच्या भूकंप मापक संस्था फिव्होल्क्सने किनारी भागात १ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळू शकतात असे सांगितले आहे. लोकांना उंच जमिनीवर किंवा अंतर्गत भागात स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने इशारा दिली आहे की, भूकंपाच्या केंद्राजवळ धोकादायक लाटा उसळू शकतात. फिलिपिन्सच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी ३ मीटरपर्यंत उंचीच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इंडोनेशिया आणि पलाऊमध्येही लाटा उसळू शकतात.
दक्षिण फिलिपिन्स प्रांताचे गव्हर्नर एडविन जुबाहिब यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, भूकंपामुळे नागरिक घाबरून पळू लागले. काही इमारतींचे नुकसान झाले आहे. हा भूकंप अतिशय जोरदार होता, असे ते म्हणाले.
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज झालेला हा शक्तिशाली भूकंप फिलिपिन्ससाठी मोठा धक्का आहे, दोन आठवड्यांपूर्वी येथे ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला होता.