

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये वाढत्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हाय-ऑक्टेन (उच्च दर्जाचे) इंधनावरील लेव्ही तिपटीने वाढवून प्रतिलिटर 325 पाकिस्तानी रुपये केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंजुरीनंतर ही वाढ लागू करण्यात आली आहे. हाय-ऑक्टेन इंधन प्रामुख्याने लक्झरी वाहनांमध्ये वापरले जाते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे दरमहा सुमारे 9 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक होते. मात्र, इराणकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 100 डॉलर्सपेक्षा अधिक झाले असून, डिझेल व जेट इंधनाचे दर झपाट्याने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनेही या संकटाची तुलना 1970 च्या तेल धक्क्यांशी केली आहे.
महागाई वाढण्याची भीती
सरकारने सार्वजनिक वाहतूक आणि विमान प्रवासावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले असले, तरी तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, इंधन दरवाढीचा परिणाम पुरवठा साखळीवर होऊन महागाई वाढू शकते. याआधीच मार्चमध्ये इंधन दर वाढल्यानंतर विमानभाड्यात मोठी वाढ झाली होती.