

Islamabad High Court Car Blast Pakistan Explosion News:
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पुन्हा एकदा हादरली आहे. आज दुपारी सुमारे 12:30 वाजता इस्लामाबाद हायकोर्टच्या बाहेर झालेल्या जोरदार स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू, तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. प्राथमिक तपासानुसार, हा स्फोट कोर्टच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडर फुटल्याने झाला आहे.
स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज शहराच्या इतर भागांपर्यंत पोहचला. स्फोटानंतर कोर्ट परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. या स्फोटाच्या वेळी परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक होती. त्यामुळे अनेक वकील आणि सामान्य नागरिक जखमी झाले.
स्फोटानंतर बचाव पथके आणि पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा स्फोट गॅस सिलिंडर फुटल्यामुळे झाल्याचं दिसतं. मात्र, स्फोटात अन्य कोणता स्फोटक पदार्थ वापरला गेला का, याचा सखोल तपास सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ञ आणि बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले असून नमुने गोळा केले जात आहेत.
या घटनेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून सुरक्षा वाढवली आहे. हायकोर्टमधील सर्व न्यायालयीन कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आणि अफवा पसरवू न देण्याचं आवाहन केलं आहे.