

Dilip Kumar Raj Kapoor ancestral house to become museum Pakistan govt gives Rs. 3.38 crore fund
पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतीय सरकारने हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, दिलीप कुमार आणि राज कपूर यांचे पेशावरमधील जुने घरं जतन करण्यासाठी तब्बल 3.38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हा निर्णय प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि पर्यटन व पुरातत्त्वविषयक सल्लागार जाहिद खान शिनवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत World Bank च्या KITE (Khyber Pakhtunkhwa Integrated Tourism Development Project) कार्यक्रमांतर्गत अनेक महत्त्वाचे पर्यटन आणि वारसास्थळांच्या संवर्धनाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले.
दिलीप कुमार (मूळ नाव युसूफ खान) आणि राज कपूर यांचे बालपण पेशावरमध्ये गेले होते. त्यांची तेथील घरे सध्या मोडकळीस आलेली असून, 2014 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या इमारतींना 'राष्ट्रीय वारसा' म्हणून घोषित केले होते.
राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे पूर्वज मूळचे पेशावर (पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत) येथील होते आणि ते भारत-पाकिस्तानच्या फाळणीपुर्वीच भारतात स्थायिक झाले होते.
पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. अब्दुस समद यांनी सांगितले की, दोन्ही वास्तूंना संग्रहालयात रूपांतरित करण्याची योजना आहे.
या संग्रहालयांत दोन्ही कलाकारांचा मुंबईपर्यंतचा प्रवास, त्यांचे चित्रपट कारकिर्दीतील टप्पे आणि वैयक्तिक आयुष्याचे विविध पैलू दाखवले जाणार आहेत. या ठिकाणी विशेष गॅलरी उभारली जाणार असून, अभ्यागतांना त्यांच्या स्मृतींशी प्रत्यक्ष भेटता येणार आहे.
डॉ. समद यांनी सांगितले की, "या उपक्रमामुळे केवळ सांस्कृतिक वारसा जपला जाणार नाही, तर स्थानिक पर्यटनातही मोठी वाढ होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील."
मुख्यमंत्री गंडापूर म्हणाले, "खैबर पख्तूनख्वाचा सांस्कृतिक वारसा हा केवळ पाकिस्तानसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी मौल्यवान आहे. आमच्या सरकारचे प्राधान्य म्हणजे या वारशाचे जतन करून पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधणे."
जून 2021 मध्ये, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा पुरातत्त्व व संग्रहालय विभागाने विधिमंडळाद्वारे राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या घरांचा कायदेशीर ताबा घेतला. या खरेदीसाठी सरकारने जमिन अधिग्रहण कायद्याचा वापर केला .
राज कपूर यांच्या हवेलीची खरेदी किंमत 1.15 कोटी रुपये होती तर दिलीप कुमार यांचे घर 72 लाख रुपयांत खरेदी केले गेले.
इतर प्रकल्पांना देखील मंजुरी
या बैठकीत अनेक संग्रहालयांचे आधुनिकीकरण, तसेच इतर पुरातत्त्वस्थळांचे जतन करण्याच्या योजनांनाही मान्यता देण्यात आली. लवकरच या सर्व प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.